OKC चा दशकपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न
हाऊसफुल्ल गर्दीतून तरुणाईचा समाजसेवेचा आदर्श
दीपक कारकर | मुंबई:
क्रिकेटच्या बॅटने सुरुवात झाली आणि समाजसेवेच्या झेंड्यावर ती पोहोचली. “ओणनवसे विभाग क्रिडा कमिटी” अर्थात OKC ने आपल्या 10 वर्षांच्या प्रवासाचा सुवर्ण महोत्सव साजरा करताना तरुणाईला फक्त खेळाडू नाही तर जबाबदार नागरिक कसे बनवता येते याचा आदर्श घालून दिला. सन 2016 मध्ये दापोली तालुक्यातील ओणनवसे गावातील काही क्रिकेटप्रेमी युवकांनी सुरू केलेल्या या संघटने गेल्या दशकात सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात अशी काही कामगिरी केली की आज ती पंचक्रोशीतील युवकांसाठी प्रेरणास्थान बनली आहे.

रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, शेतकऱ्यांसाठी कृषी मार्गदर्शन, पंचक्रोशीतील जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या गरजूंना मदत... असे एक ना अनेक उपक्रम OKC ने सातत्याने राबवले. संघटनेचे अध्यक्ष संदीप आंबेकर आणि सचिव सचिन करबेले,खजिनदार रुपेश मोगरे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारीणीने मैदानावरचा संघभाव समाजातही उतरवला. त्यामुळेच "यंग ब्रिगेड" आज खऱ्या अर्थाने "समाजसेवकांची फौज" बनली आहे.
या सुवर्णक्षणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी रविवार, 25 ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, दादर (पश्चिम) येथे कौटुंबिक मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाटककार संतोष पवार लिखित, दिग्दर्शित आणि अभिनीत "हीच खरी फॅमिलीची गंमत आहे" हे धमाल विनोदी नाटक यावेळी सादर झाले. तुफान गर्दी, हास्याचे फवारे आणि टाळ्यांच्या कडकडाटात संपूर्ण सभागृह "हाऊसफुल्ल" झाले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून OKC च्या कार्याचे भरभरून कौतुक केले.
क्रिकेटच्या एका चेंडूने सुरू झालेला प्रवास आज सामाजिक चळवळीपर्यंत पोहोचला आहे. खेळातून शिस्त, संघभाव आणि माणुसकी शिकवणाऱ्या OKC ला पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कारण OKC ने दाखवून दिले - "ट्रॉफी जिंकणे महत्त्वाचे, पण माणसे जिंकणे त्याहून मोठे."







