सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार
सुरक्षा, अपुऱ्या सुविधा आणि बंद रेल्वे थांबे पूर्ववत करण्याची मागणी
श्रीकांत खुपेरकर | कर्जत:
कर्जत रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या विविध समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार रेल्वे प्रवासी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. स्थानिक रेल्वे प्रशासनाकडून प्रवासी संघटनांना पुरेशी माहिती दिली जात नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. प्रवाशांच्या समस्यांकडे असेच दुर्लक्ष सुरू राहिल्यास यापुढे स्थानकाला भेट देणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांचा सत्कार केला जाणार नाही, अशी भूमिका कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनने घेतली आहे.

असोसिएशनच्या एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, कर्जत स्थानकात आयोजित रेल्वे जनसंवाद कार्यक्रमाबाबत प्रवासी संघटनेला किंवा प्रवाशांना पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी स्थानक मास्तरांशी भेट झाली असतानाही या उपक्रमाची माहिती देण्यात आली नाही, अशी तक्रार संबंधित सदस्याने केली. रेल्वेच्या उपक्रमांची माहिती प्रवासी संघटनांना आगाऊ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

स्थानकातील सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर आहे. रेल्वे पोलीस दल (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) समोरच अनेकदा प्रवासी तसेच वडापाव विक्रेते रेल्वे रूळ ओलांडताना दिसतात. रूळ ओलांडू नयेत, अशा घोषणा रेल्वेकडून वारंवार केल्या जात असताना प्रत्यक्षात ही धोकादायक कृती रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना का केल्या जात नाहीत, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या लोणावळा दिशेकडील टोकाला सरकता जिना किंवा लिफ्टची आवश्यकता आहे. भिवपुरी दिशेकडे अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर संपूर्ण छत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. खोपोलीकडे जाणाऱ्या काही लोकल १५ डब्यांच्या झाल्या असतानाही महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या डब्यांची जागा दर्शविणाऱ्या नियमित घोषणा होत नसल्याची तक्रार आहे.

भिवपुरी दिशेकडे प्लॅटफॉर्म क्रमांक तीन आणि ईएमयू प्लॅटफॉर्म यांना जोडणाऱ्या पादचारी पुलाचे कामही पूर्ण झालेले नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. सीएसएमटीकडे व खोपोलीकडे जाणाऱ्या लोकलचे ऐनवेळी प्लॅटफॉर्म बदलले जात असल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर उभ्या असलेल्या प्रवाशांची धावपळ होते.

कोरोना काळात कर्जत स्थानकावरील अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे थांबे बंद करण्यात आले. चार वर्षांहून अधिक काळ लोटूनही हे थांबे पूर्ववत झाले नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे. मुरबाड, खालापूर, खोपोली, बदलापूर, वांगणी आणि अंबरनाथ परिसरातील प्रवाशांना काही प्रवासांसाठी कल्याणपर्यंत जाऊन पुन्हा कर्जतच्या दिशेने प्रवास करावा लागत असल्याने त्यांची गैरसोय होते.

पनवेल – पुणे – पनवेल आणि सीएसएमटी –कोल्हापूर – सीएसएमटी या रेल्वे सेवाही अद्याप सुरू झालेल्या नसल्याचे प्रवाशांनी निदर्शनास आणले आहे. मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेतल्यानंतरही या प्रश्नांवर तोडगा निघालेला नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
पनवेल–कर्जत लोकल सुरू करण्याबाबतही वारंवार चर्चा होत असताना या लोकलचा अंतिम थांबा कुठे असेल आणि कर्जत स्थानकात अतिरिक्त लोकलसाठी काय व्यवस्था असेल, याबाबत स्पष्टता आवश्यक आहे.

सीएसएमटी–पुणे मार्गावर दिवसभरात थेट गाड्यांच्या सेवेत काही मोठ्या वेळेच्या पोकळ्या असल्याकडेही प्रवाशांनी लक्ष वेधले आहे. दुसरीकडे एसटी, खासगी बस आणि ओला-उबेरसारख्या सेवांचे पर्याय उपलब्ध आहेत. रेल्वेने गाड्यांचे वेळापत्रक सुधारून बंद सेवा पूर्ववत केल्यास प्रवाशांना दिलासा मिळण्याबरोबरच रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते.
रेल्वे प्रशासनाने या सर्व प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे आणि प्रवासी संघटनांशी नियमित संवाद साधावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.








