शिवसेनेला चणेरा विभागात मोठा धक्का
चणेरा विभाग हा कै. भाई साहेब पाशीलकर यांच्या वेळेपासून राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला होता व पुढे ही असेल-ॲड मनोजकुमार शिंदे
शहानवाज मुकादम | रोहा:
रायगड जिल्ह्यातील रोह्यातून राजकीय वर्तुळातील एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे.
रोहा तालुक्यात शिवसेनेच्या (शिंदे गटात) खिंडार पडले असून, चणेरा विभागातील दोन संपूर्ण गावांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात नुकताच हा जाहीर प्रवेश सोहळा पार पडला. रोहा तालुक्यातील खैराळे करंजीवाडी आणि खापरी या दोन्ही गावातील संपूर्ण ग्रामस्थांनी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनीलजी तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जाहीर प्रवेश पार पडला. सुनील तटकरे यांनी सर्व पक्षप्रवेश करणाऱ्यांचे पक्षात स्वागत करत, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.

याप्रसंगी अलिबाग-मुरुड-रोहा विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष ॲड. मनोजकुमार शिंदे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामचंद्र सकपाळ, ज्येष्ठ नेते हरिश्चंद्र शेठ वाजंत्री, आगरी समाज अध्यक्ष तथा युवा कार्यकर्ते प्रशांत मांडलेकर, आणि ज्येष्ठ नेते प्रमोद गंभे यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मोठ्या पक्षप्रवेशानंतर बोलताना ॲड. मनोजकुमार शिंदे यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले आहे.
या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेला रोहा तालुक्यात मोठा धक्का बसला आहे. चणेरा विभाग हा आधीही राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला होता व आहे आणि भविष्यातही राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला राहील,
हे या जनसमुदायाने सिद्ध करून दाखवले आहे, आसे ॲड मनोजकुमार शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले.
या संपूर्ण गावांच्या पक्षप्रवेशामुळे रोहा तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे,
राष्ट्रवादीचे खंबीर नेतृत्व आणि राजिप चे माजी जिल्हा अध्यक्ष कै भाई साहेब पाशीलकर ज्या प्रकारे चणेराविभागातील प्रत्येक गाव वाड्यातील गोरगरिब जनतेच्या सुखदुःखात धावतांना दिसत होते त्याच प्रमाणे ॲड मनोजकुमार शिंदे यांच्याकडून ही नागरिकांबरोबर नाते संबंध कायम आसल्याने आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष अधिक बळकट झाला आहे, तसेच खासदार तटकरे यांच्या उपस्थितीत झालेला हा पक्ष प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक मजबूत करणारा ठरणार आहे.

मुंबई येथील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनीलजी तटकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ॲड. मनोजकुमार शिंदे (कार्याध्यक्ष, अलिबाग-मुरुड-रोहा विधानसभा), रामचंद्र सकपाळ, हरिश्चंद्र वाजंत्री, प्रशांत मांडलेकर, प्रमोद गंभे यांच्या नेतृत्वाखाली हा जाहीर प्रवेश सोहळा पार पडला.







