मोबाईलच्या दुनियेपलीकडे संत परंपरेचा संस्कार
संत तुकाराम महाराजांच्या वेशभूषेत प्रथम क्रमांक
श्रीकांत खुपेरकर | मुंबई:
आजच्या काळात अनेक मुले मोबाईल आणि संगणकावरील खेळांमध्ये रमलेली असताना मालाड पश्चिम येथील अस्मिता को-ऑपरेटिव्ह सोसायटीत राहणाऱ्या सात वर्षांच्या ध्रिया विजेंद्र पाठक हिने महाराष्ट्राच्या संत परंपरेविषयी आवड निर्माण करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
ध्रियाला महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराज यांच्या जीवनाविषयी विशेष आकर्षण आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने देहू येथून संत तुकाराम महाराजांची आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होते. या वारीत सहभागी होणारे वारकरी भक्तिभावाने चालत, अभंग गात आणि नाचत आपला प्रवास करतात.
श्रावण महिन्यापासूनच ध्रियाने आई श्वेता आणि वडील विजेंद्र पाठक यांच्याकडे नवरात्रोत्सवातील वेशभूषा स्पर्धेत संत तुकाराम महाराजांची वेशभूषा करण्याची इच्छा व्यक्त केली. मुलीची आवड पाहून तिच्या पालकांनी संत तुकाराम महाराजांविषयी माहिती गोळा केली. त्यांनी ध्रियाला महाराजांच्या जीवनाविषयी सांगितले. तसेच भाषण कसे करायचे, नृत्य कसे करायचे आणि हातातील चिपळ्या कशा वाजवायच्या, याचा सरावही करून घेतला.
ध्रियाच्या आईने स्वतः वेशभूषा तयार करणाऱ्याकडे जाऊन संत तुकाराम महाराजांचा संपूर्ण पोशाख भाड्याने आणला.

रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्रियाने नवरात्रोत्सवाच्या मंचावर संत तुकाराम महाराजांच्या वेशभूषेत सादरीकरण केले. तिच्या सादरीकरणाचे उपस्थितांनी कौतुक केले. सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी पारितोषिक वितरण समितीने वेशभूषा प्रकारात ध्रियाला प्रथम क्रमांक जाहीर केला. त्या संध्याकाळी ध्रियाची तब्येत ठीक नसल्याने तिच्या आई श्वेता यांनी तिच्या वतीने पारितोषिक स्वीकारले.
ध्रियाने पुढील वर्षी आई-वडिलांसोबत किमान दोन ते तीन दिवस वारीत सहभागी होण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. पायी चालत, भक्तिगीते गात आणि नाचत प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांविषयी तिला विशेष आकर्षण आहे.
मुलांना मोबाईल आणि संगणकावरील खेळांपुरते मर्यादित न ठेवता रामायण, महाभारत, संतचरित्रे आणि भारतीय संस्कृतीची ओळख करून देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मैदानी खेळांना प्रोत्साहन दिल्यास मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल, हा संदेश ध्रियाच्या आवडीतून मिळतो.







