भौगोलिक स्थिती आणि पाणी वापराबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण
नरेश जाधव | कर्जत:
टोरेंट पॉवरच्या प्रस्तावित साईडोंगर पंप्ड स्टोरेज प्रकल्पामुळे कर्जत, नेरळ आणि परिसरातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तसेच शेती धोक्यात येणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या संदर्भात निष्कर्ष काढताना नदी प्रणालीची भौगोलिक रचना, सध्याच्या पाणीपुरवठ्याचे स्रोत, प्रकल्पाची प्रत्यक्ष पाण्याची गरज आणि अधिकृत जल उपलब्धता यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक असल्याचे तांत्रिक स्पष्टीकरणात नमूद करण्यात आले आहे. केवळ जलाशयाची साठवण क्षमता पाहून पाणीटंचाईचा निष्कर्ष काढणे तांत्रिकदृष्ट्या योग्य ठरत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

कर्जत आणि नेरळ ही शहरे उल्हास नदीकाठी वसलेली असून पेज ही उल्हास नदीची उपनदी आहे. टाटा पॉवरच्या भिवपुरी जलविद्युत केंद्रातून वीज निर्मितीनंतर सोडले जाणारे पाणी साई डोंगर प्रकल्पस्थळाच्या खालच्या बाजूस पेज नदीत मिळते आणि पुढे उल्हास नदीप्रणालीत वाहते. केंद्र सरकारच्या संकेत स्थळावरील स्थळ पाहणी अहवालानुसार भिवपुरी केंद्राचा विसर्ग प्रकल्प स्थळापासून सुमारे ५.५ किलोमीटर खाली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या वरच्या पाणलोट क्षेत्रातून येणारा हंगामी प्रवाह आणि भिवपुरी केंद्रातून खालच्या बाजूस मिळणारा सातत्यपूर्ण विसर्ग हे दोन स्वतंत्र घटक आहेत. त्यामुळे केवळ साई डोंगर प्रकल्पामुळे टाटा पॉवरचा विसर्ग बंद होऊन कर्जत – नेरळचा पाणीपुरवठा बंद होईल, असा निष्कर्ष काढता येत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातही भिवपुरी प्रकल्पाचा टेलरेस विसर्ग उल्हास नदीच्या बारमाही प्रवाहासाठी महत्त्वाचा असल्याचे नमूद आहे. उल्हास नदी ही बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण – डोंबिवली तसेच ठाण्याच्या काही भागांसाठी महत्त्वाचा जलस्रोत आहे. मात्र, प्रत्येक शहराच्या पाणीपुरवठ्याची स्वतंत्र व्यवस्था आणि इतर जलस्रोतांचाही विचार करणे आवश्यक असल्याचे दस्तऐवजात नमूद करण्यात आले आहे.

साई डोंगर-१ प्रकल्पासाठी २३ दशलक्ष घनमीटर पाणी प्रारंभिक जलाशय भरण्यासाठी आवश्यक असल्याचे नमूद आहे. मात्र, ही दररोज किंवा दरवर्षी नव्याने लागणारी पाण्याची मात्रा नसून, पर्यावरणीय मंजुरीतील नोंदीनुसार प्रारंभिक भरणा पावसाळ्यात दोन ते तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर बाष्पीभवनामुळे होणारी घट भरून काढण्यासाठी दरवर्षी सुमारे ३ दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज असून, तेही पावसाळ्यात उपलब्ध करून घेण्याचे नियोजन आहे.
पंप्ड स्टोरेज तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच पाण्याचा वारंवार पुनर्वापर करणे. वीजेची मागणी कमी असताना खालच्या जलाशयातील पाणी वरच्या जलाशयात पंप केले जाते आणि मागणी वाढल्यानंतर तेच पाणी खाली सोडून वीज निर्मिती केली जाते. त्यामुळे प्रत्येक वीज निर्मितीच्या चक्रासाठी नदीतून नव्याने तेवढेच पाणी घेण्याची आवश्यकता नसते. साईडोंगर प्रकल्प मुख्यतः ऊर्जा साठवण व्यवस्था म्हणून काम करणार असल्याचे दस्तऐवजात नमूद आहे.

पारंपरिक जलविद्युत केंद्रात वीज निर्मितीनंतर पाणी पुढील नदी प्रवाहात सोडले जाते, तर पंप्ड स्टोरेज प्रकल्पात तेच पाणी खालच्या जलाशयातून पुन्हा वरच्या जलाशयात नेऊन पुढील वीज निर्मितीच्या चक्रात वापरले जाते. दस्तऐवजात भिवपुरीसाठी वार्षिक २५० दशलक्ष घनमीटर पाणी प्रमाण आणि साई डोंगर-१ साठी वार्षिक ३ दशलक्ष घनमीटर पुनर्भरणाची गरज नमूद करण्यात आली आहे. साई डोंगर-१ ची स्थापित क्षमता ३००० मेगावॅट, तर भिवपुरी जलविद्युत केंद्राची क्षमता ७२ मेगावॅट असल्याचेही नमूद आहे.
साई डोंगर-१ साठी आवश्यक असलेला २३ दशलक्ष घनमीटर प्रारंभिक जलसाठा आणि त्यानंतरची ३ दशलक्ष घनमीटर वार्षिक पुनर्भरणाची गरज या स्वतंत्र बाबी आहेत. त्यामुळे २३ दशलक्ष घनमीटर पाणी ही दरवर्षी किंवा दररोज लागणारी पाण्याची गरज असल्याप्रमाणे मांडणे चुकीचे ठरेल, असे दस्तऐवजात स्पष्ट करण्यात आले आहे.

पाण्याच्या प्रमाणाची तुलना करण्यासाठी दिलेल्या उदाहरणानुसार, नदीत १० हजार ते १५ हजार क्युसेक्स प्रवाह सलग २४ तास राहिल्यास सुमारे २४.५ ते ३६.७ दशलक्ष घनमीटर पाणी वाहते. त्या तुलनेत साई डोंगर-१ ची २३ दशलक्ष घनमीटर प्रारंभिक गरज ही अशा प्रवाहाच्या साधारण एका दिवसाच्या पाण्याइतकी आहे, तर वार्षिक ३ दशलक्ष घनमीटर पुनर्भरणाची गरज अशाच प्रवाहाच्या साधारण दोन ते तीन तासांच्या पाण्याइतकी ठरते. मात्र, हे केवळ पाण्याच्या प्रमाणाची कल्पना देणारे उदाहरण असून प्रत्यक्ष जल उपलब्धता ठरवताना संपूर्ण हंगामातील प्रवाह, पर्जन्यमान आणि खालच्या बाजूच्या पाणी वापरकर्त्यांच्या गरजांचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
कोकणातील अनेक नद्यांचा नैसर्गिक प्रवाह प्रामुख्याने पावसावर अवलंबून असतो. पावसाळ्यानंतर, साधारण ऑक्टोबर – नोव्हेंबरपासून अनेक नद्या आणि उपनद्यांमधील प्रवाह कमी होतो. काही प्रवाहपात्रे कोरडीही पडतात. या पार्श्वभूमीवर भिवपुरी – उल्हास, खोपोली – पाताळगंगा, भिरा – कुंडलिका आणि कोयना – वशिष्ठी या नदीप्रणाली महत्त्वाच्या असून, संबंधित जलविद्युत केंद्रांमधून वीज निर्मितीनंतर सोडले जाणारे पाणी त्यांच्या खालच्या प्रवाहाला सातत्यपूर्ण आधार देते.
साई डोंगर प्रकल्पाच्या बाबतीत निर्णायक भौगोलिक मुद्दा असा आहे की भिवपुरी केंद्राचे पाणी साई डोंगर प्रकल्पस्थळाच्या खालच्या बाजूस पेज नदीत मिळते आणि पुढे उल्हास नदीत वाहते. त्यामुळे प्रकल्पस्थळी उपलब्ध होणारा हंगामी पाणलोट प्रवाह आणि भिवपुरी केंद्रातून मिळणारा विसर्ग हे स्वतंत्र घटक आहेत. या दोन्ही घटकांची सरमिसळ करून साई डोंगर प्रकल्पामुळे कर्जत – नेरळचा पाणीपुरवठा बंद होईल, असा निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे दस्तऐवजात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, साई डोंगर प्रकल्पाची अंमलबजावणी करताना विद्यमान पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, सिंचनाच्या गरजा आणि पर्यावरणीय प्रवाह सुरक्षित ठेवणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अधिकृत जल उपलब्धता अभ्यास आणि नदीप्रणालीची वास्तविक स्थिती विचारात न घेता पाणीपुरवठा धोक्यात येणार असल्याचा ठाम दावा करणे समर्थनीय नाही, असा निष्कर्ष दस्तऐवजात मांडण्यात आला आहे. पाण्याचा कार्यक्षम पुनर्वापर, विद्यमान जलवापराचे संरक्षण आणि विश्वासार्ह वीजपुरवठा यांचा समन्वय साधण्याची क्षमता या प्रकल्पात असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.







