नगरसेवक सचिन दाभेकर यांची शाळेला अनोखी विजयादशमी भेट
दिगंबर चंदने | माथेरान:
थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमधील प्राचार्य शांताराम यशवंतराव गव्हाणकर विद्यामंदिर येथे विजयादशमीच्या पूर्वसंध्येला एक स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम पार पडला. शाळेचे माजी विद्यार्थी व विद्यमान नगरसेवक मा. सचिन विठ्ठल दाभेकर यांनी आपल्या मातृसंस्थेला अत्याधुनिक डिजिटल क्लासरूमची भेट देऊन समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.
शाळेचे यश हे त्या शाळेत घडलेल्या विद्यार्थ्यांच्या यशावर अवलंबून असते, याची प्रचिती सचिन दाभेकर यांनी करून दिली. आजच्या स्पर्धात्मक आणि डिजिटल युगात माथेरान सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना देखील स्मार्ट शिक्षण मिळावे, शिक्षणाची गोडी लागावी या उदात्त हेतूने हा डिजिटल क्लासरूम उभारण्यात आला आहे.

हा प्रकल्प केवळ एकट्या दाभेकर यांचा नसून तो सामूहिक सहकार्याचा उत्तम नमुना आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती मा. श्री. सचिनभाऊ अहिर, नवनीत प्रकाशनचे रिजनल मॅनेजर श्री. सचिन जगाठिया आणि शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख मा. श्री. अनिलजी घोणे यांच्या मोलाच्या सहकार्यातून हा वर्ग साकार झाला आहे.
या छोटेखानी पण सुंदर उद्घाटन सोहळ्यास माजी नगरसेविका सौ. सोनम सचिन दाभेकर यांच्यासह नगरसेवक प्रसाद सावंत, किरण पेमारे, सीताराम कुंभार, नगरसेविका अनिता रांजाणे, अनुसया ढेबे, मराठा सामाजाचे अध्यक्ष गिरीश पवार, उबाठा शहर अध्यक्ष कुलदीप जाधव, माजी मुख्याध्यापिका कल्पना पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेचे मुख्याध्यापक ढोले सर, विदुला मॅडम, वाठोरे सर आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या डिजिटल क्लासरूममुळे आता माथेरानच्या विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच दृक-श्राव्य माध्यमातून आधुनिक शिक्षण घेता येणार आहे.







