अपूर्ण शेड आणि नवीन पादचारी पुलाच्या कामांना मंजुरी
पश्चिमेकडील पार्किंग शुल्क कमी करण्याचे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांचे आश्वासन
रायगडचे वादळ न्यूज नेटवर्क | वांगणी:
रेल्वे प्रशासन आणि प्रवाशांमधील संवाद अधिक प्रभावी व्हावा, प्रवाशांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करता याव्यात, या उद्देशाने देशभरातील सुमारे सात हजार रेल्वे स्थानकांवर गुरुवारी, दि. २२ ऑक्टोबर रोजी ‘जनसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत वांगणी रेल्वे स्थानकावरही जनसंवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी वांगणी रेल्वे स्थानकावरील पायाभूत सुविधा, प्रवाशांच्या सोयी-सुविधा, लोकल सेवा आणि पार्किंग शुल्कासह विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही प्रमुख मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याने प्रवाशांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
या कार्यक्रमाला मुंबई विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रकाश कनोजिया, वाहतूक निरीक्षक अरुप, मुख्य वाणिज्य निरीक्षक प्रवीण खडप आणि रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ निरीक्षक संतोष अहिरवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रेल्वे प्रवासी संघटना आणि वांगणी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रवाशांच्या विविध समस्यांबाबत विस्तृत निवेदने सादर करण्यात आली.

वांगणी रेल्वे स्थानकावरील अपूर्ण शेडचे काम पूर्ण करणे, तसेच कल्याण दिशेकडील जुन्या पादचारी पुलाच्या जागी सहा मीटर रुंदीचा नवीन पादचारी पूल (FOB) उभारणे, या दोन महत्त्वाच्या मागण्यांवर यावेळी चर्चा झाली. या दोन्ही कामांना मंजुरी मिळण्याच्या प्रक्रियेबाबत वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रकाश कनोजिया यांनी माहिती दिली. संबंधित कामांची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
वांगणी स्थानकावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता अपूर्ण शेड पूर्ण करणे आणि जुन्या पादचारी पुलाच्या जागी नवीन पूल उभारणे आवश्यक आहे. या कामांमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळण्यास मदत होणार आहे.
याशिवाय, वांगणी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील वाहनतळाचे शुल्क कमी करण्याबाबतही प्रवासी संघटनेने मागणी केली. यावर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत पार्किंगचे शुल्क कमी करण्याचे आश्वासन दिले.

वांगणी रेल्वे स्थानकावरून मुंबई लोकल सेवा सुरू करणे आणि लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करणे, या प्रवाशांच्या प्रमुख मागण्यांचा यावेळी पुनरुच्चार करण्यात आला. वांगणीसह परिसरातील नागरिक, नोकरदार, विद्यार्थी आणि रोज मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होऊ शकतो.

प्रवाशांच्या वतीने करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
- वांगणी येथून मुंबई लोकल सेवा सुरू करणे आणि लोकलच्या फेऱ्या वाढविणे.
- रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील बाजूस सरकता जिना आणि वाहनतळासाठी स्वतंत्र पार्किंग स्लॉट उपलब्ध करून देणे.
- फलाटांवर लिफ्टची सुविधा उपलब्ध करणे.
- स्थानकावरील अपूर्ण शेडचे काम पूर्ण करणे.
- मजूर उड्डाणपुलाचे काम जलदगतीने पूर्ण करणे.
- स्थानकाच्या मध्यवर्ती भागात नवीन पादचारी पूल उभारणे.
- आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिका आणि स्ट्रेचर वाहून नेण्यासाठी हमाल उपलब्ध करून देणे.
- कर्जत दिशेकडील बाजूस तिकीट खिडकी सुरू करणे.
- रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि लोहमार्ग पोलिसांना (GRP) स्वतंत्र चेंजिंग रूम उपलब्ध करून देणे.
- महिला प्रवाशांसाठी हिरकणी कक्ष उभारणे.
- फलाटांवरील आसनव्यवस्थेत वाढ करणे.
- वाहनतळाचे शुल्क कमी करणे.
- स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविणे.
- रेल्वेकडे उपलब्ध असलेल्या स्वयंचलित दरवाजांच्या साध्या लोकल गाड्या कल्याण-कर्जत मार्गावर शटल सेवा म्हणून सुरू करणे.
या मागण्यांमुळे वांगणी स्थानकावरील प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी दूर होण्यासोबतच स्थानकाच्या एकूण सुविधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

या जनसंवाद कार्यक्रमात प्रवासी संघटनेचे अध्यक्ष तथा उपनगरीय रेल्वे वापरकर्ते सल्लागार समितीचे (SRUCC) सदस्य मनोहर शेलार, पदाधिकारी युसूफ भाई शेख, डॉ. ताई पाटील, संदीप शहा, वांगणीच्या सरपंच वनिता आढाव, उपसरपंच अमित शेलार, देवेंद्र कांबरी, सचिन शेलार, स्थानक अधीक्षक बराल यांच्यासह प्रवासी उपस्थित होते.
प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायतीने एकत्रितपणे प्रवाशांच्या समस्यांचा पाठपुरावा करत रेल्वे अधिकाऱ्यांसमोर सविस्तर निवेदने मांडली. यावेळी अधिकारी आणि प्रवासी प्रतिनिधींमध्ये विविध प्रश्नांवर चर्चा झाली. रेल्वे प्रशासनाने काही मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे उपस्थितांकडून सांगण्यात आले.
आश्वासनांची अंमलबजावणी होण्याकडे प्रवाशांचे लक्ष
वांगणी रेल्वे स्थानकावरील जनसंवाद कार्यक्रमातून काही महत्त्वाच्या प्रश्नांबाबत सकारात्मक संकेत मिळाले असले, तरी प्रत्यक्ष कामे कधी सुरू होणार आणि प्रवाशांच्या इतर मागण्यांवर कधी निर्णय घेतला जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
रेल्वे स्थानकावरील शेड, नवीन पादचारी पूल, पार्किंग शुल्क, लोकल सेवा आणि मूलभूत सुविधांबाबत दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरल्यास वांगणीसह परिसरातील हजारो रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळू शकतो. त्यामुळे जनसंवाद कार्यक्रम केवळ चर्चेपुरता मर्यादित न राहता प्रवाशांच्या प्रश्नांच्या प्रत्यक्ष सोडवणुकीसाठी प्रभावी ठरावा, अशी अपेक्षा प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे.










