पूर्वसूचना नसल्याने प्रवाशांत नाराजी; अवघ्या १७ जणांनी मांडल्या लेखी सूचना
कर्जत रेल्वे प्रशासनावर नागरिकांची टीका
‘जनसंवाद’ नावापुरताच
कैलास म्हामले | कर्जत:
रेल्वे प्रशासन आणि प्रवाशांमधील संवाद वाढवून प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गुरुवार दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी देशभरातील रेल्वे स्थानकांवर ‘रेल जनसंवाद’ उपक्रम राबविण्यात आला. मात्र, कर्जत रेल्वे स्थानकातील या उपक्रमाची माहिती स्थानिक नागरिकांना वेळेत न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. नागरिकांना पुरेशी पूर्वसूचना न देता आयोजित केलेल्या या जनसंवादाचा उद्देशच काय, असा सवाल सोशल मीडियावरून उपस्थित करण्यात आला.
देशभरासह कर्जत तालुक्यातील कर्जत, भिवपुरी रोड, नेरळ आणि शेलू या स्थानकांवर हा उपक्रम पार पडला. कर्जत स्थानकात सुमारे ३० ते ३५ प्रवाशांनी सहभाग घेतला, तर १७ जणांनी लेखी सूचना मांडल्या. प्रवाशांच्या समस्यांचे अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन अशा तीन विभागांत वर्गीकरण करून त्यावर संबंधित वरिष्ठ कार्यालयामार्फत कार्यवाही केली जाणार आहे.
कर्जत स्थानकात नव्याने उभारण्यात येणाऱ्या पनवेल-कर्जत रेल्वेमार्गावरील स्थानकाचे नियोजन, जुन्या स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा, रेल्वे पूल, पादचारी मार्ग आणि पार्किंगसारख्या सुविधांबाबत नागरिकांना, रेल्वे प्रवासी संघटना, पत्रकार यांना सूचना मांडायच्या होत्या. मात्र, जनसंवादाची माहिती अधिकृतपणे न मिळाल्याने अनेकांना सहभाग घेता आला नाही, अशी टीका करण्यात आली.
स्टेशन व्यवस्थापक प्रभाष कुमार लाल यांनी, मुख्यालयाकडून जनसंवादाची माहिती देण्यासाठी जनसंपर्क विभागाला कळविण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान, एमआरव्हीसीचे अधिकारी मनीष कुमार यांनी नवीन कर्जत-पनवेल रेल्वे स्थानकाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करून रेल्वेकडे हस्तांतरित करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. नवीन स्थानकाला जुन्या स्थानकाच्या फलाट क्रमांक एकशी जोडण्यासाठी उड्डाणपुलाखालून पादचारी मार्गही तयार करण्यात येणार आहे.

नेरळ रेल्वे जनसंवाद ४२ प्रवाशांचा सहभाग.
दरम्यान, नेरळ रेल्वे स्थानकातही मध्य रेल्वेतर्फे जनसंवाद उपक्रम राबविण्यात आला. यावेळी रेल्वे मुख्यालयातील अधिकारी सी. एस. कल्याणकर आणि स्टेशन व्यवस्थापक गुरुनाथ पाटील उपस्थित होते. या उपक्रमात सुमारे ४२ नागरिकांनी आपल्या समस्या व सूचना लेखी स्वरूपात रेल्वे प्रशासनाकडे मांडल्या. स्थानकातील सुशोभीकरण आणि स्वच्छतेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. खोपोली लोकल १५ डब्यांची करावी, फलाट क्रमांक एकवरील शौचालय नव्याने सुरू करावे, तसेच कर्जत-कल्याण लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
मुख्यालयाकडून जनसंवादाची माहिती जनसंपर्क विभागाला देण्यात आली होती. नागरिकांना उपक्रमाची माहिती देण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या – प्रभाष लाल, कर्जत स्टेशन व्यवस्थापक
जनसंवादाची माहिती अवघ्या १५ ते २० मिनिटे आधी मिळाली. एक दिवस आधी कळविले असते, तर नागरिकांना रेल्वेच्या समस्या मांडता आल्या असत्या. जनसंवाद घेताना नागरिकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे – कृष्णा जाधव सचिव, कर्जत शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
कर्जत रेल्वे स्थानकातील अनेक समस्या रेल्वे संघटनेच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा करूनही रेल्वे प्रशासनाकडून सोडविल्या जात नाहीत. त्यातच ‘रेल्वे जनसंवाद’ उपक्रमाची संघटनेला किंवा प्रवाशांना आगाऊ माहिती न देणे, ही बाब अत्यंत खेदजनक असून प्रवाशांच्या समस्या ऐकून त्यावर ठोस कार्यवाही करण्याऐवजी असे उपक्रम राबविणे म्हणजे केवळ दिखाऊपणा ठरत नाही का? रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीपेक्षा प्रवाशांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, हीच अपेक्षा – प्रभाकर गंगावणे, सचिव – कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन







