प्रवाशांना पूर्वसूचना दिली नसल्याचा आरोप
श्रीकांत खुपेरकर | डोंबिवली:
मध्य रेल्वेच्या वतीने उपनगरीय रेल्वे स्थानकांवर आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद कार्यक्रमाबाबत प्रवाशांना पुरेशी पूर्वसूचना देण्यात आली होती का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्ष लता अरगडे आणि सरचिटणीस जीतू विशे यांनी आरोप केला की, या कार्यक्रमाची माहिती कोणत्याही प्रवासी संघटनेला आधी देण्यात आली नव्हती. तसेच संबंधित स्थानकांवरही प्रवाशांना माहिती मिळण्यासाठी फलक लावण्यात आले नव्हते.
सकाळच्या गर्दीच्या वेळेत कामावर जाणारे प्रवासी निघून गेल्यानंतर असे कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रवाशांच्या प्रत्यक्ष समस्या जाणून घ्यायच्या असतील, तर सकाळी किंवा संध्याकाळी गर्दीच्या वेळी असे कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
डोंबिवली स्थानकातील स्टेशन मास्तरांशी चर्चा केली असता, त्यांनाही या कार्यक्रमाची माहिती आदल्या रात्री मिळाल्याचे समजले. तसेच रेल्वे सुरक्षा दलाऐवजी शासकीय रेल्वे पोलिसांना (जीआरपी) कार्यक्रमाची माहिती काही वेळापूर्वीच देण्यात आल्याचा दावा महासंघाच्या प्रतिनिधींनी केला.
केवळ औपचारिकता म्हणून असे कार्यक्रम आयोजित करण्याऐवजी प्रवाशांच्या तक्रारी समजून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, कसारा स्थानकातील समस्या जाणून घेण्यासाठी मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता (Sr. DEN) निशित मल यांनी भेट दिली. यावेळी कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे सल्लागार शैलेश राऊत यांनी त्यांच्याकडे लेखी मागण्या सादर केल्या.

कसारा स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पुलाच्या पूर्व बाजूस सरकता जिना किंवा लिफ्ट बसवावी, अप मार्गावरील सेवाग्राम एक्सप्रेस, पुष्पक एक्सप्रेस आणि काशी एक्सप्रेसला कसारा येथे थांबा द्यावा, तसेच कसाऱ्यासाठी उपनगरीय लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या.
प्रवासी संघटनांशी समन्वय साधून कार्यक्रमांची माहिती आधीच देणे आणि गर्दीच्या वेळी स्थानकांची पाहणी करणे आवश्यक असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.







