तळवडे-खैरेखुर्द नदीचे पाणी अडविण्यासाठी दोन सख्ख्या भावांचा पुढाकार
शेतकरी आणि पशुधनाला उन्हाळ्यात दिलासा मिळण्याची आशा
शहानवाज मुकादम | रोहा:
तालुक्यातील खैरेखुर्द ग्रामपंचायत हद्दीतून वाहणाऱ्या तळवडे-खैरेखुर्द नदीवर सध्या जलसंवर्धनाचे एक प्रेरणादायी चित्र पाहायला मिळत आहे. नदीचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा स्थानिक शेतकरी आणि जनावरांना उपयोग व्हावा, या उद्देशाने खैरेखुर्द गावातील दोन सख्खे भाऊ फरहान फारुक धनसे आणि फिरोज फारुक धनसे यांनी स्वखर्चाने नदीवर मातीचे व गोण्यांचे बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

फेब्रुवारीत आटणारी नदी आता ऑक्टोबरमध्येच कोरडी!
तळवडे-खैरेखुर्द नदीचे पाणी पुढे खारपट्ट्यात वाहून जात असल्याने दरवर्षी उन्हाळ्यात नदी कोरडी पडते. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची टंचाई जाणवते, तर मुक्या जनावरांनाही पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. पूर्वी फेब्रुवारी महिन्यानंतर नदीचे पाणी वाहून जात असे; मात्र यंदा ऑक्टोबर महिन्यातच नदी कोरडी पडू लागल्याने पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

ही परिस्थिती लक्षात घेऊन धनसे बंधूंनी केवळ परिस्थितीवर चर्चा न करता प्रत्यक्ष कृती करण्याचा निर्णय घेतला. मजुरांच्या मदतीने ते नदीपात्रात मातीचे आणि गोण्यांचे बंधारे बांधत असून, वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी
बंधाऱ्यामुळे नदीपात्रात पाणी साठून राहण्यास आणि त्याचा काही भाग जमिनीत मुरण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे परिसरातील विहिरींची पाणीपातळी टिकून राहण्यास हातभार लागू शकतो. परिणामी, शेतकरी आणि पशुधनासाठी उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

याबाबत धनसे बंधूंनी सांगितले की, दरवर्षी नदीचे पाणी वाहून गेल्यानंतर नदीपात्र कोरडे पडते. त्यामुळे शेतीचे नुकसान होते आणि जनावरांनाही पाणी मिळणे कठीण होते. यंदा तर ऑक्टोबर महिन्यातच नदी कोरडी पडू लागल्याने आपण स्वतःहून काहीतरी पाऊल उचलले पाहिजे, असा विचार मनात आला. त्यामुळे मजुरांच्या मदतीने मातीचा बंधारा बांधण्याचे काम सुरू केले आहे. या माध्यमातून पाणी साठून राहावे आणि गावातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, हा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

धनसे बंधूंचा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी
शासनाच्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या जलसंवर्धनाच्या संदेशाला प्रत्यक्ष कृतीची जोड देत फरहान आणि फिरोज धनसे यांनी पुढाकार घेतला आहे. स्वतःच्या खर्चाने आणि मेहनतीने सुरू केलेला त्यांचा हा उपक्रम स्थानिक पातळीवर कौतुकाचा विषय ठरत आहे.
पाण्याची समस्या केवळ शासनाच्या मदतीवर न सोडता लोकसहभागातूनही त्यावर उपाय शोधता येऊ शकतो, हे धनसे बंधूंनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे तळवडे-खैरेखुर्द परिसरातील शेतकरी आणि पशुधनाला आगामी उन्हाळ्यात कितपत दिलासा मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.








