कोंढाणा लेणीच्या ऐतिहासिक वारशाचा विद्यार्थ्यांनी घेतला अभ्यासपूर्ण अनुभव
घोषणांनी दुमदुमला कोंढाणा लेणी परिसर; ५९ विद्यार्थी, पालकांचा ट्रेकमध्ये सहभाग
रायगडचे वादळ न्युज नेटवर्क | कर्जत:
सह्याद्रीच्या कुशीत दडलेल्या ऐतिहासिक वारशाची ओळख विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून करून देण्याच्या उद्देशाने शिवशंभो युवा हायकर्स कर्जत संस्थेच्या वतीने रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी कोंढाणा लेणी येथे ऐतिहासिक सहल व ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाला. कर्जत येथील तब्बल ५९ मुले, मुली व पालकांनी या ऐतिहासिक सहल व ट्रेकमध्ये सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात सुनिलबुवा देशमुख यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. यावेळी ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘श्री छत्रपती संभाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’ अशा घोषणांनी कोंढाणा लेणीचा परिसर दुमदुमून गेला.

या अभ्यासपूर्ण ऐतिहासिक सहलीदरम्यान दहिवली, कर्जत येथील इतिहास संशोधक व पुरातत्त्वज्ञ सागर माधुरी मधुकर सुर्वे (M.A. Archaeology) यांनी विद्यार्थी व पालकांना कोंढाणा लेणी तसेच सह्याद्रीच्या इतिहासाची सखोल आणि अभ्यासपूर्ण माहिती दिली.

या सहलीमध्ये सागर सुर्वे यांनी तीन सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.पहिल्या सत्रात सह्याद्रीचा भूगोल, दिशांची ओळख, नदीची ऐतिहासिक माहिती, स्थलमहात्म्याच्या दृष्टिकोनातून व्यापारी वाटांचे महत्त्व तसेच लेण्यांची निर्मिती याबाबत माहिती देण्यात आली. दुसऱ्या सत्रात सातवाहनकालीन व्यापार आणि लेण्यांचे महत्त्व, विविध प्रकारच्या लेण्या, त्या काळातील लेण्यांच्या निर्मिती व देखभालीशी संबंधित जबाबदाऱ्या यांची माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष ठिकाणी ब्राह्मी शिलालेखाचे वाचन करून त्याचा अर्थ समजावून सांगण्यात आला. लेण्यांमधील विविध वास्तू, रचना, वैशिष्ट्ये आणि शिल्पांची ओळख करून देत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निरीक्षणातून इतिहास समजावून सांगण्यात आला. तिसऱ्या सत्रात कोंढाणा लेणीविषयी प्रश्नोत्तर व संवादाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारत इतिहास, पुरातत्त्व आणि लेण्यांशी संबंधित विविध बाबी जाणून घेतल्या.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकांमधून इतिहास शिकण्याऐवजी प्रत्यक्ष ऐतिहासिक स्थळाला भेट देऊन ऐतिहासिक वारसा, वास्तुकला, शिल्पकला आणि पुरातत्त्वीय महत्त्व समजून घेण्याची संधी मिळाली. अनेक विद्यार्थ्यांनी कोंढाणा लेणीचा ऐतिहासिक वारसा आणि त्याचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून जाणून घेतले.

या ऐतिहासिक सहल व ट्रेकमध्ये मुलांसोबत मच्छिंद्र बार्शी, पूर्वा ऋषिकेश दातार, शरद साळोखे, नलिनी साळोखे, शितल पाटील, महेश पाटील, निलेश पाचपांडे (पाटील), मिनल कर्वे आणि कविता ठक्कर यांनी सक्रिय सहभाग घेतला.

यावेळी इतिहास संशोधक व पुरातत्त्वज्ञ सागर माधुरी मधुकर सुर्वे यांचा संस्थेचे अध्यक्ष विकास चित्ते व उपखजिनदार महेंद्र कर्वे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच जय मल्हार गटातील आठ जणांनी या ट्रेकमध्ये सहभाग घेतला.

याप्रसंगी सागर सुर्वे तसेच सहभागी पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे सचिव शैलेश सातपुते यांनी उपस्थित विद्यार्थी, पालक, मार्गदर्शक आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.
या ऐतिहासिक सहल व ट्रेकच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे विकास चित्ते, महेंद्र कर्वे, शैलेश सातपुते, मंजिरी कर्वे, नेहा सातपुते, भावेश ठक्कर, गौरव चित्ते आणि राधा बहुतुले यांनी विशेष सहभाग घेतला.

इतिहास, निसर्ग, साहस आणि प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण यांचा सुंदर संगम घडविणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी निश्चितच अविस्मरणीय ठरला. ऐतिहासिक वारसा जतन करण्याची आणि पुढील पिढीला त्याची ओळख करून देण्याची गरज अधोरेखित करणारा हा उपक्रम असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.







