दुर्गम भागातील ११२ विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी झटणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा नेरळ विद्या भवनकडून सन्मान
दीपक बोराडे | नेरळ:
बहिण-भावाच्या अतूट नात्याचा सण असलेल्या रक्षाबंधनाचे औचित्य साधत नेरळ विद्या भवन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी एसटी चालक व वाहकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनोखा उपक्रम राबविला. वर्षभर ग्रामीण व दुर्गम भागातून विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेत आणणे आणि घरी पोहोचविणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना विद्यार्थिनींनी नेरळ बस स्थानकावर राखी बांधून त्यांच्या सेवेला भावनिक सलामी दिली.
नारायण फेणाणि पब्लिक वेल्फेअर ट्रस्ट, मुंबई संचालित नेरळ विद्या भवन माध्यमिक विद्यालय, धामोते येथील विद्यार्थिनींनी हा उपक्रम राबविला. एसटी ही केवळ प्रवासाचे साधन नसून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे आपल्या दैनंदिन प्रवासात सहकार्य करणाऱ्या एसटी चालक व वाहकांप्रती विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता विशेष ठरली.
यावेळी नेरळ एसटी स्थानकातील चालक अशोक शिंदे, चंद्रकांत मडवी तसेच वाहक सचिन तांबे आणि दीपा भवारे यांना विद्यार्थिनींनी राखी बांधली. राखी बांधताना विद्यार्थिनींनी एसटी कर्मचाऱ्यांप्रती आदर आणि स्नेह व्यक्त केला. या अनोख्या सन्मानामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
या उपक्रमावेळी महाराष्ट्र शासन पुरस्कृत सह्याद्री इको क्लबचा अध्यक्ष विद्यार्थी तन्मय आगे, सहशिक्षक तथा सचिव संतोष कांबरी, खजिनदार मनस्वी खाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निवृत्ती खाडे तसेच लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या शिक्षिका संगीता चंदने उपस्थित होत्या.

नेरळ विद्या भवनमधील ८९ विद्यार्थिनी आणि २३ विद्यार्थी, असे एकूण ११२ विद्यार्थी देवपाडा, गिरेवाडी, उंबरवाडी, झेंडेवाडी, वंजारपाडा, तळवडे बु., अवसरे आणि वरई या ग्रामीण व दुर्गम भागांतून दररोज शाळेत येतात.
शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास आर्थिकदृष्ट्या सुलभ व्हावा यासाठी शासनाची पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत पास सवलत योजना विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ठरत आहे. मात्र या विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित, वेळेत आणि सुरळीत होण्यासाठी एसटी चालक व वाहकांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे.
दररोजच्या धावपळीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना राखी बांधून विद्यार्थिनींनी ‘तुमच्या सेवेमुळे आमचा शिक्षणाचा प्रवास सुखकर होतो’, हा कृतज्ञतेचा संदेश दिला. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, आदर आणि कृतज्ञतेची भावना रुजविणारा हा उपक्रम नेरळ परिसरात कौतुकाचा विषय ठरला.







