झाडांना राखी बांधून विद्यार्थ्यांनी दिला वृक्षसंवर्धनाचा संदेश
वृक्षांशी जपली नात्यांची वीण
नरेश जाधव | कर्जत:
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेम, आपुलकी आणि संरक्षणाच्या नात्याचा सण म्हणून सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. मात्र, निसर्गातील झाडेही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असून त्यांचे संरक्षण आणि संगोपन करणे ही आपली जबाबदारी आहे, हा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जनता विद्यामंदिर प्रशाला, दहिवली येथे यंदाचे रक्षाबंधन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरे करण्यात आले.
दि. २७ ऑगस्ट रोजी जनता विद्यामंदिर प्रशालेत ‘वृक्ष रक्षाबंधन’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर घुगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक प्रमुख सौ. वैशाली नेमाडे मॅडम आणि प्रताप गिते सर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने शाळेतील विविध वर्गांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. भाऊ-बहिणीच्या नात्याप्रमाणेच मानव आणि वृक्ष यांच्यातील अतूट नाते अधोरेखित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील वृक्षांना प्रेमाने राख्या बांधल्या. यावेळी वृक्षांचे आपल्या जीवनातील महत्त्व, पर्यावरणाचा समतोल राखण्यात झाडांची भूमिका तसेच वृक्षतोडीचे होणारे दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.

“झाडे जगली तरच आपण जगू” हा संदेश देत विद्यार्थ्यांना वृक्षांचे संरक्षण, नियमित संगोपन आणि संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले. केवळ रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यापुरते मर्यादित न राहता, ज्या वृक्षाला राखी बांधली आहे त्याचे वर्षभर संरक्षण करण्याची भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पारंपरिक उत्सवाबरोबरच पर्यावरण संवर्धन, निसर्गप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा धडा मिळाला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शाळेच्या परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनता विद्यामंदिर प्रशालेतील सर्व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या मनात लहानपणापासूनच पर्यावरणाविषयी प्रेम आणि जबाबदारीची भावना निर्माण करणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला असून, ‘वृक्ष रक्षाबंधन’च्या माध्यमातून रक्षाबंधनाला पर्यावरण संवर्धनाची सुंदर जोड देण्यात आली.







