महसूल मंत्र्यांच्या संदर्भानंतर प्रशासन ॲक्शन मोडवर
तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश
नरेश जाधव | अलिबाग, रायगड:
अलिबाग तालुक्यातील मौजे तुडाळ येथील सार्वजनिक रस्त्यावर झालेल्या कथित अतिक्रमणाच्या तक्रारीची अखेर महसूल प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. सार्वजनिक रस्ता अतिक्रमणमुक्त करून नागरिकांसाठी मोकळा करून देण्याबाबत उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, अलिबाग मुकेश चव्हाण यांनी तहसीलदार अलिबाग आणि गटविकास अधिकारी, पंचायत समिती अलिबाग यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
तुडाळ येथील रहिवासी मनोहर सीताराम पाटील यांनी सार्वजनिक रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाबाबत दि. ९ एप्रिल २०२६ रोजी थेट महाराष्ट्राच्या महसूल मंत्र्यांकडे अर्ज करून तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), रायगड-अलिबाग यांच्याकडून दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी संबंधित प्रकरण अलिबाग उपविभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आले.

विशेष म्हणजे, यापूर्वीच अलिबाग उपविभागीय कार्यालयाने दि. ४ मे २०२६ रोजी संबंधित प्रकरणात कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने अर्जदाराने पुन्हा महसूल मंत्र्यांकडे धाव घेतल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पत्रातून स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करून अर्जाचा निपटारा करण्याचे तसेच अर्जदाराला आपल्या स्तरावरून समुचित उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच हे प्रकरण ‘महसूल मंत्री संदर्भ’ असल्याने कोणत्याही प्रकारची दिरंगाई होऊ नये आणि विलंब टाळण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात यावी, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
आता तुडाळ येथील सार्वजनिक रस्त्यावर झालेले अतिक्रमण नेमके कोणत्या स्वरूपाचे आहे, त्याची प्रत्यक्ष पाहणी कधी केली जाणार आणि प्रशासनाकडून अतिक्रमण हटविण्याची कारवाई कधी केली जाणार, याकडे तुडाळ ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

महसूल प्रशासनाच्या या आदेशामुळे सार्वजनिक रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याच्या कारवाईला आता वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.







