परीक्षेला गेला म्हणून कामावरून केले कमी
थकीत पगार देण्यास टाळाटाळ
नरेश जाधव | कर्जत:
खालापूर तालुक्यातील चौक-कर्जत मार्गावरील भिलवले गावाजवळ असलेल्या हॉटेल ‘द प्लेट’ रेस्टॉरंटमध्ये पार्ट-टाइम काम करणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला त्याचा थकीत पगार मिळण्यासाठी वारंवार विनंती करूनही टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परीक्षेसाठी काही दिवसांची सुट्टी घेतल्यामुळे संबंधित विद्यार्थ्याला कामावरून कमी करण्यात आले असून, त्याने केलेल्या कामाचा मोबदला अद्याप मिळालेला नसल्याची त्याची तक्रार आहे.
कर्जत येथील चिरंजीव दराडे हा विद्यार्थी शिक्षण घेत असताना पार्ट-टाइम जॉब म्हणून भिलवले येथील हॉटेल ‘द प्लेट’ रेस्टॉरंटमध्ये काम करत होता. दरम्यान, त्याची परीक्षा असल्याने काही दिवस कामावर येणे शक्य होणार नसल्याची माहिती त्याने रेस्टॉरंटचे मॅनेजर विजय तायडे यांना दिली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने व्हॉट्सअपद्वारेही याबाबत संदेश पाठवून चार ते पाच दिवसांसाठी परीक्षेला जात असल्याचे कळविले होते, असे विद्यार्थ्याचे म्हणणे आहे.
मात्र, परीक्षा आटोपून परतल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला रेस्टॉरंटमध्ये कामावर घेण्यात आले नाही. एवढेच नव्हे तर त्याने यापूर्वी केलेल्या कामाचा पगारही देण्यात येत नसल्याचा आरोप त्याने केला आहे. आपल्या मेहनतीचा मोबदला मिळावा यासाठी वारंवार विनंती करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर चिरंजीव दराडे याने शहरातील पत्रकारांशी संपर्क साधून आपली व्यथा मांडली.

या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पत्रकार तथा साप्ताहिक ‘रायगडचे वादळ’चे संपादक प्रभाकर गंगावणे यांनी दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी हॉटेल ‘द प्लेट’चे मॅनेजर विजय तायडे तसेच सुनील गवळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. विद्यार्थ्याचा थकीत पगार दोन-तीन दिवसांत देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी मॅनेजर विजय तायडे यांनी सुरुवातीला संबंधित विद्यार्थी काम सोडून गेला असून, ‘कॉन्ट्रॅक्टच्या नियमांनुसार पगार देता येत नाही’, असे सांगितल्याचे गंगावणे यांनी म्हटले आहे.
मात्र, विद्यार्थ्याने कोणत्याही करारावर स्वाक्षरी केलेली नसल्याचे तसेच रेस्टॉरंटनेही त्याच्यासोबत अशा स्वरूपाचा कोणताही करार केला नसल्याचे सांगत केलेल्या कामाचा मोबदला रोखून ठेवणे योग्य नाही, अशी भूमिका गंगावणे यांनी मांडली. विद्यार्थ्याचा थकीत पगार तातडीने देण्याची मागणी त्यांनी केली.
त्यानंतर रेस्टॉरंटचे मॅनेजर विजय तायडे यांनी रेस्टॉरंटचे मालक शनिवारी किंवा रविवारी रेस्टॉरंटमध्ये आल्यानंतर सोमवार, दि. २४ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्याचा पगार देण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
मात्र, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजीही संबंधित विद्यार्थ्याला त्याचा थकीत पगार मिळालेला नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे रेस्टॉरंटकडून देण्यात आलेल्या आश्वासनाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणात संबंधित रेस्टॉरंटची आवश्यक त्या शासकीय यंत्रणेमार्फत चौकशी करण्याबाबतही पाठपुरावा केला जाणार असल्याचे प्रभाकर गंगावणे यांनी सांगितले. अन्न व औषध प्रशासनाच्या अखत्यारीतील बाबींविषयी आवश्यक ती तक्रार व कायदेशीर प्रक्रिया करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कर्जत-खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक तरुण शिक्षण घेत असताना पार्ट-टाइम काम करून आपल्या शिक्षणाचा खर्च भागवतात. अशा तरुणांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. रेस्टॉरंट, हॉटेल, फार्महाऊस अथवा अन्य आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या तरुणांना त्यांच्या हक्काच्या मोबदल्यासाठी त्रास सहन करावा लागू नये, अशी भूमिका यावेळी गंगावणे यांनी मांडली.
“ग्रामीण भागातील तरुणांना अशा प्रकारे कोणत्याही रेस्टॉरंट, हॉटेल किंवा फार्महाऊसकडून त्रास दिला जात असेल, तर पत्रकार म्हणून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू,” असे गंगावणे यांनी सांगितले.







