दोन्ही शो हाऊसफुल्ल
प्रदीप गोगटे झाले भावूक; म्हणाले – ‘श्री विठ्ठल मंदिर स्टेजवरील पहिल नाटक ते राज सिनेप्लेस कर्जत पहिला चित्रपट हे अंतर ५ मिनिटे आणि प्रवास २२ वर्षांचा!’
नरेश जाधव | कर्जत:
कर्जतचे सुपुत्र आणि अभिनेता प्रदीप गोगटे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘लाडू’ या मराठी चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला कर्जतकर रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कर्जत येथील राज सिनेप्लेक्स येथे रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेले चित्रपटाचे दोन्ही स्पेशल शो हाऊसफुल्ल झाले. कर्जतकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आपल्या लाडक्या कलाकाराच्या चित्रपटाला भरभरून दाद दिली.

या विशेष प्रसंगी ‘लाडू’ चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते शैलेंद्र सिंग यांचीही विशेष उपस्थिती होती. आपल्या चित्रपटाचा पहिला विशेष प्रयोग आपल्या मातीत, कर्जत येथे आणि आपल्या माणसांसमोर हाऊसफुल्ल झाल्याचा आनंद प्रदीप गोगटे यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता.

स्क्रिनिंगनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रदीप गोगटे यांनी सर्वप्रथम कर्जतकर रसिकांचे मनापासून आभार मानले. ते म्हणाले, “आयुष्यातला हा अविस्मरणीय क्षण आहे. दिग्दर्शक आणि निर्माते शैलेंद्र सिंग सर यांची विशेष उपस्थिती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सर, आज तुमच्यामुळे हा दिवस मी बघतोय. या यशाचे सर्व क्रेडिट तुम्हाला आहे.”

आपल्या या प्रवासात कुटुंबीयांनी आणि मित्रांनी दिलेल्या पाठबळाचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. “माझी आई, बाबा, बहिण माधुरी आणि भाऊ दिलीप यांनी मला खऱ्या अर्थाने ताकद दिली. या फिल्मचे लेखक, गीतकार आणि माझा मित्र यज्ञेश दौंड यानेही मला खूप मोठी ताकद दिली. तसेच असोसिएट निर्माती नीलम लोहार यांचेही मनापासून आभार,” असे त्यांनी सांगितले.

चित्रपट पाहिल्यानंतर कर्जतकर रसिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आणि शुभेच्छांमुळे आपण भारावून गेल्याचे गोगटे यांनी सांगितले.
“सर्वांनी भरभरून दाद दिली. अनेकांचे मेसेज आणि फोन येत आहेत. प्रत्येकाच्या प्रतिक्रिया ऐकून खूप समाधान मिळत आहे. खरं सांगायचं तर निःशब्द झालो आहे. हा क्षण मी कधीही विसरू शकत नाही,” असे ते म्हणाले.

प्रदीप गोगटे यांच्या भावना व्यक्त करणारा सर्वात हृदयस्पर्शी भाग म्हणजे त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाची आठवण. त्यांनी सांगितले की, “श्री विठ्ठल मंदिराच्या स्टेजवरील पहिलं नाटक ते राज सिनेप्लेक्स, कर्जत येथील पहिला चित्रपट हे अंतर फक्त पाच मिनिटांचं आहे; पण हा प्रवास तब्बल २२ वर्षांचा आहे!” या एका वाक्यात त्यांच्या प्रदीर्घ संघर्षाची, मेहनतीची आणि स्वप्नपूर्तीची कहाणी दडलेली आहे.

‘लाडू’च्या या विशेष स्क्रिनिंगच्या माध्यमातून कर्जतच्या सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रात एक वेगळा टप्पा निर्माण झाला. स्थानिक कलाकाराच्या चित्रपटासाठी अशा पद्धतीने आयोजित करण्यात आलेले हे भव्य स्क्रिनिंग आणि दोन्ही शो हाऊसफुल्ल होणे ही कर्जतकरांसाठीही अभिमानाची बाब ठरली.
“कर्जतच्या इतिहासात प्रथमच असे ग्रँड स्क्रिनिंग झाले. कर्जतकरांनी भरभरून दाद दिली. या प्रतिसादामुळे भविष्यात अजून चांगले काम करण्याची ताकद मिळाली,” असे प्रदीप गोगटे यांनी सांगितले.
या विशेष स्क्रिनिंगसाठी सहकार्याचा हात पुढे करणाऱ्या ऋषभ सुपर मार्केट, स्वर्ण भैरव ज्वेलर्स, माजी आमदार तुकाराम सुर्वे प्रतिष्ठान, डिझाईन हब स्टुडिओ आणि पारस क्लॉथ स्टोअर्स यांचेही त्यांनी मनापासून आभार मानले.
अखेर आपल्या या संपूर्ण प्रवासात देवाची कायम साथ लाभल्याचे सांगत त्यांनी देवाचेही मनापासून आभार मानले.
“प्रामाणिक प्रयत्न + संघर्ष = ‘लाडू’!” – असा संदेश देत प्रदीप गोगटे यांनी कर्जतकरांच्या प्रेमाला आणि मिळालेल्या भरभरून प्रतिसादाला मनापासून सलाम केला.








