कर्जत लोहमार्ग पोलिसांचे जीवन रक्षा अभियान
दीपक बोराडे | नेरळ:
रेल्वे प्रवाशांनी सुरक्षा नियमांचे पालन करावे, रेल्वे रुळ ओलांडताना जीव धोक्यात घालू नये तसेच गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहावे, यासाठी कर्जत लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वतीने नेरळ रेल्वे स्थानकावर ‘जीवन रक्षा अभियान’ राबविण्यात आले. या अभियानाद्वारे प्रवासी व नागरिकांना रेल्वे प्रवासातील सुरक्षिततेबाबत विविध सूचना देऊन जनजागृती करण्यात आली.
या अभियानादरम्यान पोलिसांनी तयार केलेल्या जनजागृती फलकावर “घाई जीवघेणी ठरू शकते!” तसेच “गर्दीत सतर्क रहा!” अशा महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. रेल्वे रुळ ओलांडणे, धावत्या अथवा येणाऱ्या रेल्वेजवळ जाणे आणि प्रवासादरम्यान निष्काळजीपणा करणे यामुळे गंभीर अपघात होऊ शकतात, याबाबत प्रवाशांचे लक्ष वेधण्यात आले.
रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी अधिकृत पादचारी पूल, भुयारी मार्ग किंवा निश्चित सुरक्षित मार्गाचाच वापर करावा. शॉर्टकटच्या नादात रेल्वे रुळ ओलांडणे टाळावे, असे आवाहन लोहमार्ग पोलिसांकडून करण्यात आले. रेल्वे येत असताना रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करणे अत्यंत धोकादायक असून, काही क्षणांची घाई आयुष्यभराचे नुकसान करू शकते, असा संदेश या अभियानातून देण्यात आला.
गर्दीच्या वेळी प्रवाशांनी आपल्या मोबाईल, पाकीट, बॅग व इतर मौल्यवान वस्तूंबाबत सतर्क राहावे, अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये आणि संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असेही आवाहन करण्यात आले.

आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी 1512 हेल्पलाइन क्रमांकाची माहितीही प्रवाशांना देण्यात आली.
या ‘जीवन रक्षा अभियानात’ पीआय किरण मतकर, पीएसआय लोखंडे, पीएसआय कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार राजेंद्र बागुल, मेघा पाटील, अजय शिर्के, महेश शिरसागर तसेच होमगार्ड मनीष खुणे, कैलास तरे, राजेश भट, वेंकी धनवटे, केतन चंचे यांच्यासह कर्जत लोहमार्ग पोलीस ठाण्याचा संपूर्ण पोलीस स्टाफ व होमगार्ड स्टाफ उपस्थित होता.
कर्जत रेल्वे स्थानकावर राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे प्रवाशांमध्ये रेल्वे सुरक्षा नियमांबाबत जागरूकता निर्माण झाली. रेल्वे प्रशासन व लोहमार्ग पोलिसांनी अशा प्रकारची जनजागृती सातत्याने राबविणे आवश्यक असून, प्रवाशांनीही स्वतःच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.







