निलेश सांबरे यांचा विद्यार्थ्यांना प्रेरणामंत्र
दीपक बोराडे | नेरळ:
ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देत त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नेरळ येथील विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षण, करिअर आणि भविष्यातील संधींबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे साहेब होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर मोठी स्वप्ने साकार करता येतात, असा विश्वास व्यक्त केला.
“परिस्थिती तुमची ओळख ठरवणार नाही; तुमची मेहनत तुमची ओळख निर्माण करेल. मोठी स्वप्ने पाहा. ती पूर्ण करण्यासाठी जिजाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे,” असा प्रेरणादायी संदेश निलेश सांबरे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि मोठी स्वप्ने पाहण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात आहे. मात्र आर्थिक परिस्थिती, शैक्षणिक साधनांची कमतरता तसेच योग्य मार्गदर्शनाचा अभाव यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या प्रगतीसमोर अडथळे निर्माण होतात. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आवश्यक ते बळ देण्यासाठी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
“तुमच्या स्वप्नांची फिकीर तुम्ही करू नका; तुमच्या शिक्षणाची आणि भविष्याची फिकीर करण्यासाठी जिजाऊ तुमच्या सोबत आहे,” असा विश्वास विद्यार्थ्यांना देण्यात आला. शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देऊन आपल्या ध्येयाच्या दिशेने सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहनही करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे साहेब, गणेश सर, सज्जन जमदरे, विद्या मंदिर मंडळाचे सचिव विवेक पोतदार, शाळेचे मुख्याध्यापक भांडे सर, प्रसाद थोरवे, प्रवक्ते नवनीत यशवंतराव, उत्तम शेळके, ॲड. अविनाश भोईर, अमर मिसाळ, आशिष जोशी, अंकुश दाबणे, जनार्दन म्हसकर यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्याबरोबरच त्यांच्या पुढील शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या संधी, करिअरचे विविध पर्याय आणि ध्येय निश्चित करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
शिक्षण, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती साकार करण्यासाठी पुढे यावे, हा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.







