१७४ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य; दोन्ही शाळांना ६५ इंची स्मार्ट टीव्हीची भेट
COREdu SEED Foundationच्या E3 उपक्रमातून ग्रामीण शिक्षणाला आधुनिकतेची जोड
दिगंबर चंदने | कर्जत:
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने COREdu SEED Foundationच्या वतीने केंद्र शाळा भिसेगाव अंतर्गत RZP भिसेगाव आणि RZP किरवली या दोन्ही शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप तसेच डिजिटल शिक्षण सुविधांचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या उपक्रमांतर्गत RZP भिसेगाव येथील ६४ आणि RZP किरवली येथील ११०, अशा एकूण १७४ विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. यामध्ये स्कूल बॅग, स्टील वॉटर बॉटल, नोटबुक्स, स्टेशनरी, ड्रॉइंग बुक तसेच रंगसाहित्याचा समावेश होता. आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात अभ्यासासाठी मोठी मदत होणार आहे.

ग्रामीण विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता दृक्-श्राव्य आणि अनुभवाधारित शिक्षण मिळावे, यासाठी दोन्ही शाळांना ६५ इंची स्मार्ट टीव्ही तसेच डिजिटल शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सुविधेच्या माध्यमातून शिक्षकांना विविध शैक्षणिक संकल्पना व्हिडिओ, चित्रे आणि डिजिटल माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविता येणार आहेत.

डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर झाल्यास विद्यार्थ्यांची विषय समजून घेण्याची क्षमता, उत्सुकता आणि सहभाग वाढण्यास मदत होणार असून, पारंपरिक अध्यापन पद्धतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे.

COREdu SEED Foundationच्या “Empowering Education Excellence (E3)” या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.
E3 उपक्रमांतर्गत शैक्षणिक विकास, वाचन संस्कृती, शिक्षक प्रशिक्षण, प्रकल्पाधारित शिक्षण (PBL), अनुभवाधारित शिक्षण, मेंदू विकास, योग, संगणक कौशल्य, पर्यावरणपूरक उपक्रम, कला, क्रीडा आणि शाळा परिवर्तन अशा विविध उपक्रमांवर भर दिला जात आहे.

संस्थेच्या विविध शैक्षणिक उपक्रमांचा आतापर्यंत २७५७ हून अधिक विद्यार्थी आणि ८६ शिक्षकांना लाभ झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या कार्यक्रमास COREdu SEED Foundationच्या संस्थापक व संचालक कांचन थोरवे व सुधीरकुमार गजभिये, वरिष्ठ समन्वयक स्वप्नील गायकवाड, सहाय्यक समन्वयक माधुरी भोपत्राव, क्लस्टर हेड महेश खाडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक भास्कर थोरवे, माजी सरपंच दत्तात्रेय सांबरी, पोलीस पाटील विवेक बाडेकर, तसेच भिसेगावच्या नगरसेविका, सुमारे ४० पालक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक डिजिटल साधने, शैक्षणिक साहित्य आणि नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती उपलब्ध करून देऊन त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला चालना देण्याच्या दिशेने COREdu SEED Foundationचा हा उपक्रम शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.







