निष्कृष्ट दर्जाची व खराब झालेली भाजी पुरविल्याचा आरोप
आदिवासी ठाकूर समाज संघटनेने केली पोलखोल
पाच-सहा दिवसांच्या अंतराने भाजीपुरवठा; केळी, दुधी, कोबीसह अनेक भाज्या खराब अवस्थेत आढळल्याचा दावा
मोतीराम पादीर | कर्जत:
कर्जत तालुक्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना सकस व पौष्टिक आहार मिळावा, तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र, या निधीचा योग्य विनियोग होतो आहे का आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात दर्जेदार आहार मिळतो आहे का, याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे चित्र समोर आले आहे.
कर्जत तालुक्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणारी भाजी निष्कृष्ट दर्जाची व खराब अवस्थेतील असल्याचा आरोप आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, भाजीचा पुरवठा नियमितपणे न होता पाच ते सहा दिवसांच्या अंतराने केला जात असल्याचा दावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

गेटवरच टेम्पो अडवून भाजीची पाहणी
गेल्या गुरुवारी आश्रमशाळेत भाजीचा पुरवठा करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा सोमवारी भाजी घेऊन टेम्पो आश्रमशाळेच्या परिसरात आला. त्यामुळे दोन पुरवठ्यांमध्ये तब्बल पाच ते सहा दिवसांचे अंतर असल्याचे कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले.
यावेळी आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आश्रमशाळेच्या गेटवरच भाजी घेऊन येणारा टेम्पो अडवून त्यातील भाजीची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान अनेक भाज्या खराब झालेल्या व काळवंडलेल्या अवस्थेत आढळून आल्याचा दावा करण्यात आला.
केळीच्या सालीवर काळपटपणा, दुधीवर काळे डाग, तर कोबी काळसर पडलेली असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. याशिवाय इतरही काही भाज्या ताज्या नसून खराब झालेल्या अवस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
विद्यार्थ्यांना खराब भाजी खायला देत असल्याचा आरोप
आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना अशाच प्रकारची खराब अथवा निष्कृष्ट दर्जाची भाजी शिजवून खायला दिली जात असल्यास त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने या प्रकाराची तातडीने चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
दरम्यान, कर्जत तालुक्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये भाजीपुरवठ्याचा ठेका गजानन महाराज कॅटर्स या कंत्राटदाराच्या नावाखाली चालविला जात असल्याचे संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. याच कंत्राटदाराकडून तालुक्यातील आश्रमशाळांना भाजीचा पुरवठा केला जात असल्याचा त्यांचा आरोप आहे.

कंत्राटदाराला थेट फोन करून जाब
भाजीची पाहणी केल्यानंतर आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित कंत्राटदाराशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. पुरविण्यात आलेली भाजी निष्कृष्ट दर्जाची असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी
या संपूर्ण प्रकाराबाबत आदिवासी विकास विभाग, ठाणे तसेच पेण प्रकल्प अधिकारी यांनी तातडीने लक्ष घालून आश्रमशाळांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या भाजी व इतर खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करावी, अशी मागणी आदिवासी ठाकूर समाज संघटनेने केली आहे.
संबंधित कंत्राटदाराच्या कामकाजावर प्रशासनाने नियमित देखरेख ठेवावी आणि विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा आहार पुरविला जात असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास आदिवासी ठाकूर समाज संघटना आक्रमक भूमिका घेणार असून मोर्चा काढण्याचा इशाराही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
आता या आरोपांची प्रशासनाकडून कितपत दखल घेतली जाते आणि आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या भाजी व भोजनाच्या गुणवत्तेची प्रत्यक्ष तपासणी केली जाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








