लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ब्रिटिशकालीन वास्तूची भयंकर दुरावस्था
ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन करून ‘पत्रकार भवन’ म्हणून उपयोगात आणा : प्रभाकर गंगावणे
नरेश जाधव | कर्जत:
कर्जत शहराच्या ऐतिहासिक वारशाची साक्ष देणाऱ्या आणि ब्रिटिशकालीन काळापासून महसूल प्रशासनाचा कारभार पाहिलेल्या जुन्या तहसील कार्यालयाच्या वास्तूची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. नवीन प्रशासकीय भवनात तहसील कार्यालय व प्रांत कार्यालय स्थलांतरित झाल्यानंतर या ऐतिहासिक वास्तूकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचेही अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कर्जत शहरातील टेकडीवर असलेली ही जुनी तहसील कार्यालयाची वास्तू अनेक दशकांपासून कर्जत तालुक्याच्या महसूल प्रशासनाचे महत्त्वाचे केंद्र होती. याच वास्तूमधून तहसील कार्यालयाचा कारभार चालत असल्याने कर्जतच्या प्रशासकीय इतिहासात या वास्तूला विशेष महत्त्व आहे. मात्र, नवीन प्रशासकीय इमारत उभारल्यानंतर जुने तहसील कार्यालय रिकामे झाले आणि त्यानंतर या वास्तूच्या देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

देखभालीअभावी वास्तूची अवस्था चिंताजनक
दीर्घकाळापासून देखभाल व दुरुस्ती न झाल्यामुळे या ऐतिहासिक वास्तूची अवस्था दिवसेंदिवस खराब होत आहे. वास्तूच्या परिसरात अस्वच्छता, झाडाझुडपांची वाढ तसेच इमारतीची पडझड होण्याची शक्यता यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. ऐतिहासिक वारसा असलेली ही वास्तू अशाच पद्धतीने दुर्लक्षित राहिल्यास भविष्यात तिचे अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता आहे.
कर्जतच्या इतिहासाशी जोडलेली ही वास्तू केवळ एक जुनी सरकारी इमारत नसून, अनेक दशकांच्या प्रशासकीय वाटचालीची साक्ष देणारा ऐतिहासिक ठेवा आहे. त्यामुळे तिचे जतन व संवर्धन करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
‘पत्रकार भवन’ म्हणून वापर करण्याची मागणी
कर्जत तालुक्यात पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार भवन उपलब्ध नसल्याने या ऐतिहासिक वास्तूचा योग्य पद्धतीने पुनर्विकास करून ती ‘कर्जत पत्रकार भवन’ म्हणून कार्यान्वित करावी, अशी मागणी साप्ताहिक ‘रायगडचे वादळ’चे संपादक प्रभाकर गंगावणे यांनी केली आहे.
या वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व कायम ठेवून तिचे संवर्धन, आवश्यक दुरुस्ती आणि सुशोभीकरण करण्यात यावे. त्यानंतर पत्रकारांसाठी कार्यालयीन कामकाज, बैठका, पत्रकार परिषदा, प्रशिक्षण उपक्रम तसेच सामाजिक आणि लोकहिताच्या कार्यक्रमांसाठी या वास्तूचा उपयोग करता येऊ शकतो, असे गंगावणे यांनी सांगितले.

“कर्जतच्या इतिहासाची साक्ष देणारी ही वास्तू प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नष्ट होण्यापूर्वी तिचे संवर्धन होणे आवश्यक आहे. तालुक्यात पत्रकार भवनाची आवश्यकता असताना या ऐतिहासिक वास्तूचा पत्रकार भवनासाठी उपयोग केल्यास एकीकडे ऐतिहासिक वारसा जतन होईल आणि दुसरीकडे पत्रकारांसाठी कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध होईल,” असे प्रभाकर गंगावणे यांनी म्हटले आहे.
प्रशासनाकडे लवकरच पत्रव्यवहार
या मागणीसंदर्भात लवकरच संबंधित प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे प्रभाकर गंगावणे यांनी सांगितले. ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन करून तिचा लोकहितासाठी उपयोग करण्याच्या या मागणीला नागरिकांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.
कर्जतच्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून, शहराच्या इतिहासाशी जोडलेल्या वारशाचे पुढील पिढ्यांसाठी संवर्धन करण्याची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे जुन्या तहसील कार्यालयाच्या वास्तूकडे तातडीने लक्ष देऊन तिचे संरक्षण, दुरुस्ती आणि सुशोभीकरण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.








