कळंब जवळ वाहन चालकांची जीवघेणी कसरत
दीपक बोराडे | नेरळ:
पावसाळा आला की कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावरील कळंबचा हा वळणदार रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात सापडतो, यंदाही त्याला अपवाद ठरला नाही. कळंब पोलीस स्टेशनच्या पुढील धोकादायक वळणावर सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत.
कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग हा महत्त्वाचा मार्ग असून या मार्गावर दिवसभर मोठ्या संख्येने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. मात्र, कळंबजवळील या वळणाचा भाग अद्याप काँक्रीट करण्यात आलेला नाही. रस्ता सरळ करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या पुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडल्याने वळणाचा हा भाग अपूर्ण राहिला आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडत असल्याचे चित्र आहे.

संबंधित एमआरडीएसए यंत्रणेकडून खड्डे बुजविण्याची तात्पुरती कार्यवाही केली जाते. मात्र, पाऊस आणि अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे काही दिवसांतच हे खड्डे पुन्हा उखडतात. त्यामुळे खड्डे बुजविण्याची तात्पुरती मलमपट्टी करून प्रश्न सुटत नसल्याचे दरवर्षी दिसून येत आहे.
पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्याने त्यांची खोली वाहनचालकांच्या लक्षात येत नाही. अचानक खड्डा समोर आल्याने वाहनांचा वेग कमी करताना किंवा खड्डा चुकवताना अपघाताचा धोका निर्माण होत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना या मार्गावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागत असून, रात्रीच्या वेळी हा धोका अधिकच वाढतो.
दरवर्षी खड्डे बुजविण्याऐवजी या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिक व वाहनचालकांकडून होत आहे. कळंबजवळील अपूर्ण राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रीटीकरण तातडीने पूर्ण करावे, रस्ता सरळ करण्यासाठी रखडलेले पुलाचे काम पूर्ण करावे तसेच पूर्ण झालेला नाल्यावरील पूल तातडीने वाहतुकीसाठी सुरू करावा, अशी मागणी आहे.
कळंब जवळील अपूर्ण काँक्रीट रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून रस्ता सरळ करण्यात यावा, अनेक वर्षांपासून रखडलेले पुलाचे काम मार्गी लावावे, पूर्ण झालेला नाल्यावरील पूल वाहतुकीसाठी खुला करावा आणि तोपर्यंत धोकादायक वळणावरील खड्ड्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक लक्षात घेऊन रस्त्याची सुरक्षितता आणि दर्जाची तपासणी करून तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी होत आहे.

पावसाळा आला की या रस्त्यावर खड्डे पडतात, खड्डे बुजवले जातात आणि पाऊस थांबल्यावर पुन्हा तेच खड्डे दिसतात. राष्ट्रीय महामार्गावर दरवर्षी अशी परिस्थिती निर्माण होणे ही गंभीर बाब आहे. खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा रखडलेले पुलाचे काम पूर्ण करून रस्ता कायमस्वरूपी काँक्रीट करणे गरजेचे आहे. एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची प्रशासनाने वाट पाहू नये – मूहिब लोगडे (सामाजिक कार्यकर्ते)








