सर्वपक्षीय मातब्बर नेत्यांनी एकत्रितपणे रेल्वे मंत्र्यांकडे प्रश्न मांडावा – विकास चित्ते
कर्जतच्या विकासासाठी विशेष महाबैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन
नरेश जाधव | कर्जत, रायगड :
कर्जत-पनवेल रेल्वे मार्ग सुरू होण्यापूर्वीच कर्जत शहर व परिसरातील सध्याची वाहतूक कोंडी आणि भविष्यात रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर वाढणारी संभाव्य वाहतूक लक्षात घेऊन आपत्कालीन व पर्यायी वाहतुकीसाठी रेल्वे मार्गाला समांतर पूल उभारण्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विकास चित्ते यांनी केली आहे.
सध्या कर्जत शहरातील विविध प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडीची समस्या जाणवत असून त्याचा फटका वाहनचालक, शाळकरी विद्यार्थी, पादचारी आणि नागरिकांना बसत आहे. भविष्यात कर्जत-पनवेल रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर या वाहतूक व्यवस्थेवर आणखी ताण येण्याची शक्यता असल्याने आताच नियोजन करून पर्यायी मार्ग व समांतर पूलाची व्यवस्था करणे आवश्यक आहे, असे चित्ते यांनी म्हटले आहे.
या मागणीसाठी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, खासदार आप्पासाहेब बारणे, मंत्री भरत गोगावले, मंत्री अदिती तटकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार सुनील तटकरे यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रित चर्चा करावी. या सर्व लोकप्रतिनिधींनी मिळून हा प्रश्न थेट केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसमोर मांडून विशेष बाब म्हणून समांतर पूल प्रकल्पाला मंजुरी व आवश्यक निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कर्जत परिसरात सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे मातब्बर नेते आणि लोकप्रतिनिधी कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पातळीवर या नेत्यांचा प्रभाव असून कर्जतच्या विकासासाठी त्यांची राजकीय ताकद एकत्र आली, तर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागू शकतात. त्यामुळे कर्जतच्या विकासासाठी सर्वपक्षीय एकजुटीची गरज आहे, असे चित्ते यांनी स्पष्ट केले.
कर्जतकरांच्या वतीने सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित बैठक घेऊन कर्जत परिसरातील रेल्वे, रस्ते, वाहतूक, पूल, पायाभूत सुविधा आणि इतर प्रलंबित प्रश्नांवर विशेष महाबैठक आयोजित करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. या बैठकीत तातडीच्या तसेच भविष्यातील विकासकामांचे नियोजन करून केंद्र व राज्य शासनाकडे संयुक्तपणे पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
“कर्जतच्या विकासासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन जोर लावला, तर कर्जतला विशेष निधी मिळू शकतो आणि कर्जत तालुका महाराष्ट्रातील एक आदर्श तालुका म्हणून विकसित होऊ शकतो. कर्जतकरांच्या हितासाठी ही मागणी खूप आशेने आणि विश्वासाने लोकप्रतिनिधींसमोर मांडत आहे,” असे सामाजिक कार्यकर्ते विकास चित्ते यांनी सांगितले.







