‘वंदे मातरम्’च्या जयघोषात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह
ग्राउंड रिपोर्ट करणाऱ्या विद्यार्थिनींचा विशेष सन्मान
सोनिया जोशी | कर्जत:
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत कर्जत तालुका मराठी पत्रकार संघ आणि कर्जत प्रेस क्लब यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मध्यरात्रीच्या ध्वजारोहण सोहळ्यास कर्जतकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. देशभक्तीचा उत्साह, तिरंग्याचा अभिमान आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने स्वर्गीय भाऊसाहेब राऊत चौकाचा परिसर भारावून गेला होता. यंदाचे मध्यरात्रीच्या ध्वजारोहणाचे २२ वे वर्ष होते.
कर्जत शहरातील स्वर्गीय भाऊसाहेब राऊत चौकात १४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री या विशेष ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत ज्येष्ठ पत्रकार वसंत ठाकूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर रायगड प्रेस क्लबचे विभागीय सचिव ॲड. राहुल देशमुख यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. मध्यरात्रीच्या ध्वजारोहणाची परंपरा, त्यामागील उद्देश आणि गेल्या २२ वर्षांतील या उपक्रमाचा प्रवास याविषयी त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.
यानंतर कर्जत नगराध्यक्षा पुष्पा दगडे यांनी स्वर्गीय भाऊसाहेब राऊत चौकाच्या नामफलकास पुष्पहार अर्पण केला. सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्याचा कार्यक्रम पार पडला.
त्यानंतर घड्याळात बरोबर मध्यरात्री १२ वाजून ५ मिनिटांनी रस्त्यांची दुरवस्था आणि नागरिकांच्या समस्या आपल्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणाऱ्या कु. नेहा आत्माराम घारे हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
या वेळी नेहा घारे हिची मैत्रीण कु. जोत्स्ना रोहिदास मुकणे, रायगड प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष संजय मोहिते, कर्जत तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विजय मांडे, कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश पवार, कार्याध्यक्ष विलास श्रीखंडे, सचिव अजय गायकवाड, तसेच अनिल गवळे, ज्ञानेश्वर बागडे, विपुल माळी, रमाकांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्राउंड रिपोर्ट करणाऱ्या विद्यार्थिनींचा सन्मान
कर्जत शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नेहा घारे आणि जोत्स्ना मुकणे यांनी केलेल्या ग्राउंड रिपोर्टची विशेष दखल घेण्यात आली. त्यांच्या धाडसी आणि सामाजिक जाणीवेतून केलेल्या कार्याचे कौतुक म्हणून नगराध्यक्षा पुष्पा दगडे यांच्या हस्ते दोघींचा शाल, गुलाबपुष्प आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या सन्मानामुळे सामाजिक प्रश्नांवर आवाज उठविणाऱ्या युवा पिढीला निश्चितच प्रोत्साहन मिळाले असून, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी युवक-युवतींनी पुढे यावे, असा सकारात्मक संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
देशप्रेमी नागरिकांची मोठी उपस्थिती
या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष राजेश लाड, रजनी गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष उमेश गायकवाड, नगरसेवक अशोक राऊत, रामदास गायकवाड, महेश चंदन, मानसी कानिटकर, सुमिता गायकवाड, विजय हरिश्चंद्रे, विनायक उपाध्ये, ॲड. कैलास मोरे, ॲड. प्रदीप सुर्वे, अशोक शिंदे, पंकज ओसवाल, नलिनी साळोखे, रवींद्र लाड, नयनेश दळवी, विकास चित्ते, मुफद्दल डाभिया, ज्ञानेश्वर वाडीले, असीफ मिर्झा, आत्माराम घारे, राजेंद्र वैशंपायन, कल्पेश शहा, साईनाथ श्रीखंडे, गणेश कांबळे, मंदार दगडे, शैलेश सातपुते, रोहिदास मुकणे, अमीर माणियार, नवाज तांबोळी, साहिल ठाकूर, गौरव चित्ते, वेदांत किरडावकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मध्यरात्रीच्या शांत वातावरणात तिरंगा डौलाने फडकत असताना उपस्थित नागरिकांनी दिलेली राष्ट्रभक्तीची घोषणाबाजी आणि उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे कर्जतच्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाला एक वेगळेच भावनिक आणि देशभक्तीपूर्ण स्वरूप प्राप्त झाले.







