नरेश जाधव / कर्जत :
कर्जत शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या बेशिस्त पार्किंगमुळे कर्जतकर नागरिक, विद्यार्थी, पादचारी तसेच वाहनचालक अक्षरशः हैराण झाले आहेत. कर्जत नगरपरिषद हद्दीतील विविध प्रमुख रस्त्यांवर चारचाकी वाहने रस्त्याच्या कडेला दीर्घकाळ उभी केली जात असल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध असलेली जागा कमी होत आहे.

विशेषतः अभिनव शाळा, कर्जत न्यायालय, प्रशासकीय भवन तसेच नगरपरिषदेकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने पार्क केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना अरुंद रस्त्यातून मार्ग काढावा लागत असून, अनेक वेळा वाहतूक संथ होऊन कोंडीची परिस्थिती निर्माण होत आहे.
या बेशिस्त पार्किंगचा सर्वाधिक फटका शाळकरी विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि पादचाऱ्यांना बसत आहे. रस्त्यावरून चालताना पादचाऱ्यांना वाहनांच्या मधून मार्ग काढावा लागत असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच समोरासमोर वाहने आल्यास वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता वाढते.

कर्जत शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्यानुसार नियोजित पार्किंग व्यवस्था आणि वाहतूक नियोजनाची गरज निर्माण झाली आहे. केवळ रस्त्याच्या कडेला वाहने उभी करून पार्किंगची समस्या सोडवली जाणार नाही. नगरपरिषद आणि संबंधित वाहतूक यंत्रणेने संवेदनशील ठिकाणांची पाहणी करून नो-पार्किंग क्षेत्र निश्चित करणे, आवश्यक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करणे तसेच बेशिस्त पार्किंगवर नियमित कारवाई करणे गरजेचे आहे.
कर्जतकर नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक व्यवस्था मिळावी यासाठी कर्जत नगरपरिषद व संबंधित प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

रस्ते वाहनांसाठी आहेत की पार्किंगसाठी? हा प्रश्न सध्या कर्जतकरांकडून उपस्थित केला जात असून, प्रशासन आता या वाहतूक समस्येवर काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.







