कोंदिवडे गावाला जोडणाऱ्या रस्त्याची चाळण
‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?’ विद्यार्थिनींचा सवाल
हास्यविनोदातून विद्यार्थिनींनी मांडली रस्त्याची दुरावस्था
आमदार, खासदारांसह स्थानिक लोकप्रतिनिधी आता तरी दखल घेणार का?
नरेश जाधव | कर्जत :
कर्जत तालुक्यातील कोंदिवडे गावाला जोडणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांमध्ये रस्ता, असा प्रश्न वाहनचालकांसह ग्रामस्थांना पडला आहे. ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले असून, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे, या रस्त्याच्या दुरावस्थेचा सर्वाधिक फटका शाळकरी विद्यार्थ्यांना बसत आहे.
दरम्यान, रस्त्याच्या या दुरावस्थेकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी कोंदिवडे गावातील काही शाळकरी विद्यार्थीनींनी हास्यविनोदाच्या माध्यमातून रस्त्याची ‘रिपोर्टिंग’ करणारा भन्नाट व्हिडिओ तयार केला आहे. सोशल मीडियावर प्रसारित झालेला हा व्हिडिओ सध्या कर्जत तालुक्यात चर्चेचा विषय ठरत असून, या विद्यार्थीनींच्या कल्पकतेचे आणि धाडसाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

‘हा रस्ता द्रुतगती महामार्गासारखा आहे…!’
या व्हिडिओमध्ये एका शालेय विद्यार्थिनीने हातात माईकप्रमाणे छत्री धरून ‘रिपोर्टर’ची भूमिका साकारली आहे. त्यानंतर ती ‘ज्योत्स्ना’ नावाच्या विद्यार्थिनीला रस्त्याबाबत माहिती देण्यास सांगते.
त्यावर ज्योत्स्ना विनोदी शैलीत म्हणते की, “हा रस्ता जसा काही द्रुतगती महामार्गासारखा आहे. अशा गाड्या जात आहेत की त्यांच्या पोटातील पाणी सुद्धा हालत नाही!”
यानंतर ती कॅमेऱ्यासमोर रस्त्याची परिस्थिती दाखवत “रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे, काहीच कळत नाही,” अशा मिश्कील शब्दांत रस्त्याच्या दुरवस्थेचे चित्रण करते.
विद्यार्थिनींच्या या मिश्कील ‘रिपोर्टिंग’मागे मात्र गंभीर वास्तव दडलेले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच दुचाकीस्वारांचे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नसल्यामुळे अपघाताचा धोका आणखी वाढला आहे.
विद्यार्थिनींच्या कल्पकतेचे नागरिकांकडून कौतुक
नेहा घारे, मानसी पवार, ज्योत्स्ना आदी शाळकरी विद्यार्थीनींनी हा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील समस्या हास्यविनोदाच्या माध्यमातून मांडत या विद्यार्थीनींनी सामाजिक प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे.
लहान वयातही आपल्या गावातील मूलभूत समस्येची जाणीव ठेवून त्या समस्येवर आवाज उठविण्याचा प्रयत्न करणाऱ्या या विद्यार्थीनींचे तालुक्यातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
आता लोकप्रतिनिधी दखल घेणार का?
कोंदिवडे गावाला जोडणाऱ्या रस्त्यांची झालेली दुरवस्था ही केवळ वाहनचालकांची समस्या नसून, ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला आणि शेतकरी अशा सर्वांनाच या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
शाळकरी विद्यार्थीनींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रस्त्याची वस्तुस्थिती समोर आणल्यानंतर आता कर्जत तालुक्यातील आमदार, खासदार, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सरपंच आणि संबंधित प्रशासन या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
विद्यार्थिनींनी हास्यविनोदातून केलेली ही ‘रिपोर्टिंग’ प्रत्यक्षात संबंधित लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला एक प्रकारची चपराकच असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
विद्यार्थिनींच्या या व्हिडिओची केवळ सोशल मीडियावर चर्चा न होता, संबंधित यंत्रणांनी त्याची दखल घेऊन कोंदिवडे गावाला जोडणाऱ्या रस्त्याची तातडीने पाहणी करावी आणि खड्डे बुजवून रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
आता या शाळकरी विद्यार्थीनींच्या ‘रिपोर्टिंग’ची दखल घेऊन प्रत्यक्ष रस्त्याची डागडुजी करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन पुढाकार घेणार का? याकडे संपूर्ण कर्जत तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.








