₹१५ हजार रोख, मोबाईल, क्रेडिट कार्ड, आधार-पॅनसह महत्त्वाची कागदपत्रे मिळाली; प्रवाशाने मानले आभार
नरेश जाधव | कर्जत:
उल्हासनगरहून कर्जतला येताना लोकल ट्रेनमध्ये सामानाच्या डब्यात विसरलेली बॅग कर्जत रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे प्रवाशाला सुखरूप परत मिळाली. या बॅगेमध्ये ₹१५ हजारांची रोख रक्कम, सुमारे ₹१४ हजार किमतीचा मोबाईल फोन, क्रेडिट कार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे व साहित्य होते. रेल्वे पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेचे प्रवासी प्रमोद सिताराम पवार यांनी कौतुक करून पोलिसांचे आभार मानले.
थरती ग्रुप, भिसेगाव, कर्जत येथील रहिवासी प्रमोद सिताराम पवार (वय ४७) हे आपल्या पत्नीसह उल्हासनगर येथून कर्जतला येण्यासाठी सायंकाळी ४.४४ वाजताची खोपोलीकडे जाणारी लोकल पकडली होती. त्यांच्याकडे सामान अधिक असल्याने त्यांनी सामानाच्या डब्यात बसून प्रवास केला.
लोकल सायंकाळी ५.११ वाजता कर्जत रेल्वे स्थानकात पोहोचल्यानंतर पवार दाम्पत्य सामान घेऊन घरी जाण्यास निघाले. मात्र काही अंतर गेल्यानंतर प्रमोद पवार यांच्या लक्षात आले की, त्यांची लाल रंगाची शॅक बॅग लोकलच्या सामानाच्या डब्यातच राहिली आहे.
या बॅगेमध्ये त्यांच्या पत्नीचा मोबाईल फोन, ₹१५ हजार रोख रक्कम, क्रेडिट कार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे होती. दरम्यान, लोकल कर्जत स्थानकातून पुढे निघून गेल्याने पवार यांनी कोणताही विलंब न करता कर्जत रेल्वे पोलीस ठाणे गाठले.
त्यांनी ठाणे अंमलदार पोहेवा/२५८५ घालमे तसेच दिवसपाळी प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक कुरुंद यांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपनिरीक्षक कुरुंद यांनी तातडीने पळसदरी तसेच खोपोली स्थानकावर कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलिसांना सदर लोकल अटेंड करण्याच्या सूचना दिल्या.
मात्र तोपर्यंत संबंधित लोकल खोपोलीहून पुन्हा कर्जतच्या दिशेने रवाना झाली होती. त्यावेळी पळसदरी रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असलेल्या महिला होमगार्ड/९६७ गायकवाड यांना लोकल पुन्हा तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यांनी तत्परतेने लोकल अटेंड केली.
यावेळी सामानाच्या डब्यात लाल रंगाची बॅग एका महिलेच्या ताब्यात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सदर महिलेने ती बॅग तिची असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक कुरुंद यांनी महिला होमगार्ड गायकवाड यांना सदर महिलेसह बॅग घेऊन कर्जतपर्यंत येण्याच्या सूचना दिल्या.
लोकल कर्जत रेल्वे स्थानकात पोहोचल्यानंतर पोलीस शिपाई/१७६० देवकर, होमगार्ड/४२९८ धनवटे, होमगार्ड/५०७९ गंगावणे, महिला होमगार्ड/१२८६ गोळे आणि महिला होमगार्ड/१२४८ पुजारी यांनी लोकल अटेंड केली. तपासणीदरम्यान पवार यांनी वर्णन केलेली लाल रंगाची शॅक बॅग मिळून आली.
बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये ₹१५ हजारांची रोख रक्कम, सुमारे ₹१४ हजार किमतीचा मोबाईल फोन, क्रेडिट कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे व साहित्य सुरक्षित असल्याचे आढळून आले.
रेल्वे पोलिसांच्या तातडीच्या आणि समन्वयपूर्ण कारवाईमुळे प्रवाशाची मौल्यवान बॅग व त्यातील सर्व साहित्य सुखरूप परत मिळाले. त्यामुळे प्रमोद सिताराम पवार यांनी कर्जत रेल्वे पोलीस तसेच संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड यांचे मनःपूर्वक आभार मानले.
प्रवाशाची तक्रार मिळताच वेळ न दवडता संबंधित लोकलचा माग काढणे, पळसदरी व खोपोली येथील कर्मचाऱ्यांना सूचना देणे आणि लोकल कर्जतला परतल्यानंतर बॅग सुरक्षितपणे ताब्यात घेणे, या संपूर्ण कारवाईत कर्जत रेल्वे पोलिसांची तत्परता आणि परस्पर समन्वय ठळकपणे दिसून आला. त्यांच्या या कामगिरीचे प्रवाशांकडून कौतुक होत आहे.







