प्रतिमा पूजनातून महामानवांना अभिवादन
वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प
रजनीकांत पवाळी | कडाव:
कर्जत तालुक्यातील कडाव येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय बहुउद्देशीय केंद्रात जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आदिवासी क्रांतीवीर बिरसा मुंडा आणि नाग्या बाबा यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी या महान व्यक्तिमत्त्वांना अभिवादन करून त्यांच्या कार्याला उजाळा दिला.

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून शासकीय बहुउद्देशीय केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बदाम, अशोक आणि वडाच्या झाडांची रोपे लावण्यात आली. आदिवासी समाजाचा जल, जंगल आणि जमीन यांच्याशी असलेला पारंपरिक संबंध अधोरेखित करत पर्यावरणाचे जतन व संवर्धन करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना तालुका प्रमुख सुदामदादा पवाळी यांनी उपस्थित आदिवासी समाजबांधवांना जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व सांगितले. आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा, कला आणि निसर्गाशी असलेले नाते जपण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच उपस्थित सर्व आदिवासी समाजबांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमादरम्यान लहान मुलांनी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक वेशभूषा, नृत्य आणि उत्साहपूर्ण सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. उपस्थितांनी चिमुकल्यांच्या या कलाविष्काराचे कौतुक केले.
या कार्यक्रमास भिमाबाई किसन पवार, माजी उपसभापती कर्जत पंचायत समिती; सुजित किसन वाघमारे, ग्रामसेवक मंडणगड; अमर गंगाराम शिंदे; सामाजिक कार्यकर्ते रोहिदास यशवंत देवघरे; अशोक किसन पवार, माजी सरपंच कडाव ग्रुप ग्रामपंचायत; जयराम बापू मुकणे; बळीराम लक्ष्मण पवार; सुरचंद जानू पवार; बांगा धर्मा केवारी; माळू लक्ष्मण वाघमारे; नारायण शंकर वाहे यांच्यासह आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिमा पूजन, वृक्षारोपण, आदिवासी संस्कृतीचे दर्शन आणि समाजबांधवांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कडाव येथील जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.







