वारकरी वेषातील चिमुकल्यांनी वेधले सर्वांचे लक्ष
विठ्ठल-रुख्मिणी, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांचा हरिनाम गजर
भक्तिमय वातावरणात ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती
दत्तात्रय शेडगे / खोपोली:
रायगड जिल्हा परिषद शाळा, गारमाळ येथे आषाढी एकादशीचा पवित्र सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची पारंपरिक वेशभूषा परिधान करून गावातून हरिनामाच्या गजरात आकर्षक दिंडी काढली. या दिंडीने संपूर्ण गारमाळ गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले.
दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी भगवान विठ्ठल-रुख्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांसह वारकरी संप्रदायातील विविध संतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. मुलांनी पांढरा कुर्ता, धोतर, डोक्यावर गांधी टोपी आणि हातात टाळ घेत अभंग गात दिंडीत सहभाग नोंदविला. तर मुलींनी नऊवारी साडी परिधान करून डोक्यावर तुळशी वृंदावन घेत टाळ-मृदुंगाच्या गजरात “ज्ञानोबा-तुकाराम”चा जयघोष केला. त्यांच्या पारंपरिक वेशभूषा आणि भक्तिभावाने उपस्थित ग्रामस्थांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी अभंग, भजन, फुगडी आणि गवळणी सादर करून वारकरी परंपरेचे जिवंत दर्शन घडविले. हरिनामाच्या गजराने आणि टाळ-मृदुंगाच्या निनादाने शाळा परिसरासह संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांनीही या दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करत विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.

गारमाळ जिल्हा परिषद शाळेत वर्षभर विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक सण-उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, भारतीय संस्कृतीची ओळख, धार्मिक परंपरांबद्दल आदर आणि सामाजिक एकात्मतेची भावना वृद्धिंगत होत असल्याचे पालकांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा सातत्याने नाविन्यपूर्ण आणि संस्कारक्षम उपक्रम राबवत असल्याने ही शाळा परिसरातील आदर्श शाळा म्हणून ओळख निर्माण करत आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ डमाळे तसेच शिक्षिका सविता दारशेवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या सहकार्यामुळे आषाढी एकादशीचा हा सोहळा संस्मरणीय ठरला.








