दिगंबर चंदने / नेरळ:
नारायण फेणाणि पब्लिक वेल्फेअर ट्रस्ट मुंबई संचालित नेरळ विद्या भवन माध्यमिक विद्यालय, धामोते शाळेत भारतीय संस्कृतीचे अद्वैत स्थान असणाऱ्या महनीय महर्षी व्यास पूजन आषाढ पौर्णिमा तथा गुरूपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नुकतेच युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक वारसा स्थळांमध्ये तथागत गौतम बुद्ध यांनी सारनाथ येथे केलेल्या पहिल्या धम्मचक्र प्रवर्तनाचे अर्थात वर्षावास प्रवचन मालिकेचा शुभारंभ म्हणूनही आजच्या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे हे सांगण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी गुरूपौर्णिमा उत्सवातून विषद केला.

याप्रसंगी विचारमंचावर प्रमुख अतिथी युवा सामाजिक कार्यकर्ते संदेश हजारे, उद्योजक संतोष विरले, सेवाज्येष्ठ शिक्षक संतोष कांबरी, शाळेच्या मुख्याध्यापिका अनघा जोगळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सेवाज्येष्ठ शिक्षक सचिन अभंगे यांनी केले.

विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करणारे ओरिगामी कलेतून विविध रंगीबेरंगी शुभेच्छा कार्ड व पुष्पगुच्छ भेट देऊन सर्व उपस्थितांचे स्वागत केले. दरम्यान, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रचिती धुळे तसेच इंग्रजी व बुध्दिमत्ता चाचणी विषयात प्रावीण्य मिळविलेल्या नियती हजारे या विद्यार्थिनींना प्रबोधन दूत सचिन अभंगे यांच्या संकल्पनेतून छात्र प्रबोधन कुमार साहित्य अंक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भाषणांमध्ये मनस्वी खाडे, तन्मय आगे, पार्मी गायकवाड, संस्कृती धुळे, दिशा चव्हाण, हस्तिका विरले, चंदना धुळे, गौरी विरले यांनी बदलत्या काळप्रवाहात आजच्या शिक्षण व्यवस्थेत समाजाप्रती आदर्श कार्य करणारा नागरिक घडण्यासाठी “आईवडील समवेत गुरुजी” हीच संकल्पना उललेखनीय आहे असे ज्वलंत स्फूर्तीदायक विचारांतून पटवून दिले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अनुक्रमे मंगेश थोरवे, पुष्पा सोनवणे, एकनाथ बुरूड, विद्या भुसाळ, पंचशिला जाधव, विकास पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.









