विद्यार्थ्यांच्या अभंग, भजनांनी दुमदुमले शाळेचे प्रांगण
दिगंबर चंदने / कर्जत:
कर्जत तालुक्यातील डिकसळ येथील डेफोडिल्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा पवित्र सण मोठ्या भक्तिभावाने, उत्साहाने आणि सांस्कृतिक वातावरणात साजरा करण्यात आला. शुक्रवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
आषाढी एकादशीच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शाळेच्या माता पालक संघ २०२६ मधील महिला पालकांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी सौ. नीता मते, सौ. दीपिका साटम, सौ. धनश्री भोसले आणि सौ. भाग्यश्री झांबरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात सौ. नीता मते यांनी सादर केलेल्या सुरेल आणि भक्तिमय भजनाने झाली. त्यांच्या मधुर आवाजातील भजनामुळे संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अभंग, भजने, भक्तिगीते तसेच आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व सांगणारी भाषणे सादर केली.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळेचे प्रांगण विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेले होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक वेशभूषा, भक्तिगीते आणि सांस्कृतिक सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या मनात आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, बंधुता आणि सांस्कृतिक मूल्यांची रुजवण व्हावी, तसेच शिक्षणासोबतच मानवी जीवनमूल्यांची जोपासना व्हावी, या उद्देशाने शाळेत विविध सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारे असे उपक्रम शाळेत सातत्याने राबविले जात असल्याचे यावेळी दिसून आले.

कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आरती नितीन सावंत यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व माता पालक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व आभार मानले. तसेच शाळेच्या आगामी उपक्रमांमध्येही पालकांचे असेच मोलाचे सहकार्य व सहभाग मिळत राहावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या संस्कारक्षम जडणघडणीसाठी आयोजित करण्यात आलेला हा भक्तिमय सोहळा उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला.








