धापया मंदिरासमोरील रस्त्यावरील पाणी तुंबण्याचा प्रश्न अखेर मार्गी
रायगडचे वादळ न्युज नेटवर्क | कर्जत:
कर्जत शहरातील धापया मंदिरासमोरील रस्त्यावर पावसाचे पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाल्याने अनेक दिवसांपासून पाणी तुंबत होते. या तुंबलेल्या घाण पाण्यातून नागरिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत होती. तसेच वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे घाण पाणी पादचारी व दुचाकीस्वारांच्या अंगावर उडत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.
या गंभीर समस्येबाबत सामाजिक कार्यकर्ते सतीश मधुसूदन मुसळे यांनी नगरपालिकेचे अधिकारी व्यंकटेश रायन यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. सुरुवातीला काम करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, काही दिवस उलटल्यानंतर पुन्हा संपर्क साधल्यावर संबंधित ठिकाणी काही करता येणार नसल्याचे सांगण्यात आले. “येथे होल पाडल्यास गटारातील पाणी रस्त्यावर येईल,” असे कारण देत या कामाबाबत असमर्थता व्यक्त करण्यात आली.
यानंतर सतीश मुसळे यांनी नगरसेवक प्रशांत (बाबू) पाटील यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. नगरपरिषद कार्यालयात चौकशी करून तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रशांत पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधत हे काम पूर्ण करून घेतले.
नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक मार्ग मोकळा करून दिल्याने आता पावसाचे पाणी रस्त्यावर साचणार नसून नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी दरवर्षी पाणी तुंबत असतानाही याकडे दुर्लक्ष होत होते. मात्र सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीमुळे अखेर हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

काम सुरू असताना स्थानिक नागरिक राजेश लाड यांनीही घटनास्थळी भेट देत, “मुसळे काका, तुम्ही हा विषय लावून धरला म्हणूनच हे काम पूर्ण झाले,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे या कामाबाबत समाधान वाटल्याचे सतीश मुसळे यांनी सांगितले.


या कामासाठी मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, नगरसेवक प्रशांत (बाबू) पाटील, कार्यतत्पर मुकादम निकेश फाळे, मुकादम अनिल खाडे, सफाई कर्मचारी अभिजित भालेराव आणि सुरज वाघेला यांनी केलेल्या सहकार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते सतीश मधुसूदन मुसळे यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त केले.
यावेळी सतीश मुसळे म्हणाले, “काम करण्याची प्रामाणिक इच्छाशक्ती असेल तर कोणतीही समस्या सोडवता येते. लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या अडचणी तत्परतेने सोडवल्या तर त्यांना मतांसाठी कोणाच्या दारात जाण्याची गरज भासणार नाही. नागरिक स्वतःहून त्यांच्यावर विश्वास दाखवतील. नगरसेवक प्रशांत (बाबू) पाटील यांनी हे काम करून दिल्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन करतो.”








