निराधार वयोवृद्धास उपजिल्हा रुग्णालयात दाखल
अखेर सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने वृद्धावर उपचार सुरू
सामाजिक कार्यकर्ते अजय वर्धावे यांच्या पुढाकाराचे कौतुक
नरेश जाधव / कर्जत:
कर्जत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मच्छी मार्केट परिसरात मागील चार ते पाच वर्षांपासून एक निराधार वयोवृद्ध व्यक्ती अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत होती. मिळेल त्या ठिकाणी उघड्यावर वास्तव्य करून तसेच दानशूर व्यक्तींनी दिलेल्या अन्नावर उदरनिर्वाह करणाऱ्या या वृद्धाची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून गंभीरपणे खालावली होती. इतकेच नव्हे तर अशक्तपणामुळे त्यांना शौचास जाणेही शक्य होत नसल्याने जागेवरच शौच करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. ही परिस्थिती पाहून परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत होती.
या वृद्धाची दयनीय अवस्था पाहून सामाजिक कार्यकर्ते अजय वर्धावे यांनी तात्काळ त्यांची विचारपूस केली आणि उपचारासाठी दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरुवातीला संबंधित वृद्धाने दवाखान्यात जाण्यास नकार दिल्याने त्यांच्यासमोर अडचण निर्माण झाली.

त्यानंतर अजय वर्धावे यांनी शहरातील विविध व्हॉट्सअप समूहांद्वारे या घटनेची माहिती देत मदतीचे आवाहन केले. ही माहिती मिळताच कर्जत नगरपरिषदेचे नगरसेवक ॲड. रोहित ओसवाल यांनी विविध सामाजिक संस्थांशी संपर्क साधून या निराधार वृद्धाच्या उपचारासाठी सहकार्याची विनंती केली. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी स्वतः पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला.
यानंतर नगरसेवक ॲड. रोहित ओसवाल, नगरसेवक तथा गटनेते महेंद्र चंदन, नगरसेवक प्रशांत उर्फ बाबु पाटिल, सामाजिक कार्यकर्ते अजय वर्धावे, प्रशांत शिंदे तसेच कर्जत नगरपरिषदेचे कर्मचारी केतन गायकवाड यांनी संयुक्तपणे त्या वृद्धाला तातडीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू केले असून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, त्या वृद्धाच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांना चालणेही कठीण झाले होते. अशा बिकट परिस्थितीत कोणतीही अपेक्षा न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत अजय वर्धावे यांनी दाखविलेली तत्परता आणि नगरसेवकांसह सहकाऱ्यांनी दिलेले सहकार्य हे माणुसकीचे जिवंत उदाहरण ठरले आहे.
कर्जत शहरात अनेक वर्षे उपेक्षित अवस्थेत जीवन जगणाऱ्या या निराधार वृद्धाला अखेर उपचाराचा आधार मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. समाजात अशा निराधार, गरजू आणि असहाय व्यक्तींसाठी पुढे येणाऱ्या संवेदनशील व्यक्तींचे कार्य इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत असून, “माणुसकी अजूनही जिवंत आहे” याची प्रचिती या घटनेतून पुन्हा एकदा आली आहे.







