नगरसेवक सचिन दाभेकरांनी स्वखर्चातून केली ब्लीचिंग पावडरची फवारणी
प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप; मुख्याधिकाऱ्यांविरोधात अविश्वास ठरावाची मागणी, सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेकडे माथेरानकरांचे लक्ष
दिगंबर चंदने / माथेरान:
माथेरानमध्ये मान्सूनपूर्व काळात जंतुनाशक औषधांची फवारणी, ब्लीचिंग पावडर टाकणे, धूप प्रतिबंधक बंधारे उभारणे आदी आवश्यक उपाययोजना होणे अपेक्षित असताना, यंदा अशा कामांच्या पूर्वतयारीचा अभाव स्पष्टपणे दिसून येत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक सचिन दाभेकर यांनी केला आहे.
या संदर्भात नगरपरिषदेच्या सभेत तसेच अधिकृत व्हॉट्सअप समूहावर वारंवार सूचना करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रभाग क्रमांक ५ मधील संत रोहिदास नगर आणि पंचशील नगर येथील पेव्हर ब्लॉक रस्त्यांवर शेवाळ साचल्यामुळे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन दाभेकर यांनी स्वतःच्या खर्चातून त्या रस्त्यांवर ब्लीचिंग पावडर टाकण्याचे काम केले.
यावेळी त्यांनी प्रशासनावर टीका करत, “नगरसेवकांच्या वारंवार सूचनांनंतरही जर मान्सूनपूर्व आवश्यक नागरी सुविधा पुरविल्या जात नसतील, तर त्या सुविधा नगरसेवकांनीच स्वतःच्या खर्चातून द्यायच्या का? मग नागरिकांकडून कर वसूल करण्याचा उद्देश काय?” असा सवाल उपस्थित केला. तसेच माथेरान नगरपरिषद प्रशासन धृतराष्ट्राची भूमिका घेत असल्याचा आरोप करत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
माथेरानमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, याची पूर्वकल्पना असूनही जंतुनाशक फवारणी, ब्लीचिंग पावडर, धूप प्रतिबंधक उपाययोजना आदी मान्सूनपूर्व कामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात सत्ताधारी नगरसेवकांनी अविश्वासाचा ठराव आणावा, त्याला विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा राहील, अशी भूमिका देखील सचिन दाभेकर यांनी स्पष्ट केली.
दरम्यान, नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर विद्यमान सत्ताधारी नगरसेवक नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे आता संपूर्ण माथेरानकरांचे लक्ष लागले आहे.







