वापरलेली इंजेक्शने व वैद्यकीय कचरा उघड्यावर
नागरिकांसह जनावरांच्या जीवितालाही धोका
दोषींवर कठोर कारवाईची मागणी
रायगडचे वादळ न्यूज नेटवर्क / कडाव:
कर्जत तालुक्यातील कडाव गावातील ऐतिहासिक व प्रसिद्ध गोपाळ तलाव परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून संपूर्ण परिसर दुर्गंधीने व्यापला आहे. तलावाच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, त्यामध्ये रुग्णालयातील वापरलेली इंजेक्शने, औषधांच्या रिकाम्या बाटल्या तसेच इतर जैविक वैद्यकीय कचरा उघड्यावर फेकून दिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तलाव परिसरात सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी येणारे नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या परिसरात गाई, म्हशी आणि इतर पाळीव जनावरे मुक्तपणे फिरत असल्याने वापरलेल्या इंजेक्शनच्या सुया किंवा इतर धोकादायक वैद्यकीय कचऱ्यामुळे त्यांच्या जीवितालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. अशा प्रकारचा जैविक कचरा संसर्गजन्य आजारांचा प्रसार होण्यास कारणीभूत ठरू शकतो, अशी भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
ही गंभीर बाब कडाव गावातील सामाजिक कार्यकर्ते देवव्रत फुलाजी पवार यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यांनी गोपाळ तलाव परिसरात घाण व कचरा टाकणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच रुग्णालयातील जैविक वैद्यकीय कचरा, वापरलेली इंजेक्शने आणि औषधांच्या रिकाम्या बाटल्या उघड्यावर फेकून देणाऱ्या संबंधित खाजगी दवाखान्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संपूर्ण परिसराची स्वच्छता करावी, वैद्यकीय कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट लावावी आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी नियमित देखरेख व कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे.

गोपाळ तलाव हा कडाव गावातील महत्त्वाचा व प्रसिद्ध परिसर असल्याने त्याचे सौंदर्य आणि पर्यावरण जपणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, सध्या या ठिकाणी निर्माण झालेल्या अस्वच्छतेमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या गंभीर प्रकाराकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.








