स्पीड ब्रेकर आणि पथदिव्यांचा अभाव ठरतोय अपघातांना कारणीभूत
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिकांमध्ये संताप
ओमकार नागावकर / अलिबाग:
नागोठणे हायवेवरील नवेनगर फाट्यावर मंगळवारी (दि. २८ जुलै) रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास तीन दुचाकींची एकमेकांना जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काळ्या रंगाची एनएक्स प्लसर दुचाकी (एमएच-०६ सीटी-५४४८) भरधाव वेगाने पेझारीच्या दिशेने जात असताना काळ्या रंगाची युनिकाँन दुचाकी (एमएच-०६ एव्ही-६०३७) आणि काळ्या रंगाची शाईन दुचाकी (एमएच-०६ बीएच-०८७७) यांच्यात जोरदार धडक झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान, नवेनगर फाट्यावर स्पीड ब्रेकर आणि पथदिव्यांची सुविधा नसल्याने यापूर्वीदेखील येथे अनेक अपघात घडले असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. या ठिकाणी वारंवार अपघात होत असतानाही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अपघातांची मालिका थांबविण्यासाठी नवेनगर फाट्यावर तातडीने स्पीड ब्रेकर बसविण्यात यावा तसेच पुरेशा पथदिव्यांची व्यवस्था करण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोयनाड पोलीस करीत आहेत.







