श्रीकांत खुपेरकर / आसनगाव:
कल्याण–कसारा उपनगरीय रेल्वे मार्गावरील आसनगाव रेल्वे स्थानकावरील गंभीर सुरक्षा आणि पायाभूत सुविधांतील त्रुटींमुळे हजारो प्रवाशांच्या, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानकावरील सर्वात गंभीर समस्या म्हणजे लोकल ट्रेन आणि प्लॅटफॉर्म क्रमांक १ यांच्यामधील असलेली अतिशय मोठी दरी (गॅप).
या धोकादायक गॅपमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच दिव्यांग प्रवाशांना ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक उतरताना घसरून पडल्याच्या घटनाही घडल्या असून, भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
प्रवाशांच्या तक्रारीनुसार, स्थानकावरील लिफ्ट आणि सरकते जिने (एस्कलेटर) वीजपुरवठा खंडित होताच बंद पडतात. हे दोन्ही यंत्रणा महावितरणच्या (MSEB) वीजपुरवठ्यावर अवलंबून असल्याने वीज गेल्यानंतर ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि सामानासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होते.
प्रवाशांच्या मदतीसाठी आणि स्थानकावर देखरेख ठेवण्यासाठी पादचारी पुलाजवळ उभारण्यात आलेले हेल्प डेस्क अनेकदा कर्मचारीविना बंद अवस्थेत दिसते. आपत्कालीन मदत आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेल्या या केंद्राचा उद्देशच त्यामुळे निष्फळ ठरत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे.
स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रेल्वे सुरक्षा बल (RPF), सरकारी रेल्वे पोलीस (GRP) आणि महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) यांचे कर्मचारी अनेकदा प्लॅटफॉर्मवर दिसत नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
पावसाळ्यात प्लॅटफॉर्मवरील छतांमधून पाणी गळत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर मुसळधार पावसामुळे कल्याण–कसारा मार्गावरील उपनगरीय लोकल गाड्या अनेकदा २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत.
स्थानकाच्या पूर्वेकडील बाहेर पडण्याच्या मार्गावर अरुंद रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनियमितपणे उभ्या करण्यात आलेल्या रिक्षांमुळे मोठी वाहतूक कोंडी होत आहे. विशेषतः सीएसएमटीहून येणाऱ्या लोकल गाड्या स्थानकात आल्यानंतर ही समस्या अधिक तीव्र होते. वाहतूक पोलीस काही काळासाठीच उपस्थित असल्याने परिस्थितीत फारसा फरक पडत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
अलीकडेच GRP आणि RPF यांनी विविध रेल्वे स्थानकांवर जनजागृती मोहीम राबवून प्रवाशांना रेल्वे रुळ ओलांडू नये, त्याऐवजी पादचारी पुलाचा वापर करावा, असे आवाहन केले होते. यासाठी फलक लावण्यात आले आणि ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देण्यात आल्या. मात्र, आसनगाव स्थानकाच्या कसारा बाजूस अपुरे कुंपण आणि देखरेखीअभावी अनेक प्रवासी अजूनही रेल्वे रुळ ओलांडताना दिसतात. केवळ जनजागृती करून उपयोग नसून त्यासोबत प्रभावी अंमलबजावणी आणि भक्कम सुरक्षा व्यवस्था आवश्यक असल्याचे प्रवाशांचे मत आहे.
कल्याण–कसारा/कर्जत प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव म्हणाले,
“सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केवळ कागदावर असल्यासारखी वाटते. त्यांची उपस्थिती प्रत्यक्ष प्लॅटफॉर्मवर दिसली पाहिजे. ड्युटीवरील कर्मचाऱ्यांनी मोबाईल कार्यालयात जमा करून वॉकी-टॉकीद्वारे संपर्क साधावा. एकाच ठिकाणी थांबण्याऐवजी त्यांनी सतत प्लॅटफॉर्मवर गस्त घालून रुळ ओलांडणाऱ्यांना रोखावे आणि प्रवाशांना मदत करावी. तसेच हेल्प डेस्क कार्यरत वेळेत कायमस्वरूपी सुरू ठेवणे आवश्यक आहे.”
ते पुढे म्हणाले, “मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म क्रमांक १ ची उंची वाढवून ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील धोकादायक अंतर तातडीने कमी करावे.”
कल्याण–कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे सल्लागार शैलेश राऊत म्हणाले,
“आसनगाव हे कल्याण–कसारा मार्गावरील अत्यंत वर्दळीचे स्थानक आहे. मात्र, ट्रेनच्या पायरी आणि प्लॅटफॉर्ममधील मोठी दरी प्रवाशांसाठी गंभीर धोका निर्माण करत आहे. तातडीने उपाययोजना न झाल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते. मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेले सुरक्षा हेल्प डेस्क अनेकदा कर्मचारीविना बंद असते, ही दुर्दैवी बाब आहे. त्याचबरोबर प्रवाशांनीही स्वतःच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे रुळ ओलांडणे टाळून पादचारी पुलाचाच वापर करावा.”










