₹३८.७० लाखांचे ई-टॉयलेट की मृत्यूचा सापळा?
महिला पर्यटक ई-टॉयलेटमध्ये अडकली
निकृष्ट दर्जाच्या कामावर नागरिकांचा संताप, भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी
दिगंबर चंदने / माथेरान:
माथेरान नगरपालिकेने प्रशासकीय कार्यकाळात सुमारे ₹३८ लाख ७० हजार खर्च करून उभारलेल्या ई-टॉयलेट प्रकल्पावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बाजारभावापेक्षा जास्त किंमतीत ई-टॉयलेटची खरेदी करण्यात आली असून या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. यासंदर्भात मागविण्यात आलेली माहिती देण्यासही पालिका प्रशासन टाळाटाळ करत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी माथेरानच्या ‘एको पॉईंट’ येथे उभारण्यात आलेल्या ई-टॉयलेटमध्ये एक महिला पर्यटक अडकल्याची धक्कादायक घटना घडली. संबंधित महिला शौचालयात गेल्यानंतर आतून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असताना दरवाज्याच्या कडीचे हँडल तुटल्याने ती आतच अडकून पडली.
सुदैवाने महिलेचे पती बाहेरच उभे असल्याने महिलेने आरडाओरड करून त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी तातडीने तेथील व्यावसायिक रेखा पाटील आणि भरत कांरडे यांना मदतीसाठी बोलावले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रेखा पाटील यांनी आत अडकलेल्या महिलेला धीर दिला, तर भरत कांरडे यांनी प्रसंगावधान राखत बाहेरून दरवाज्याचे हँडल तोडून महिलेची सुखरूप सुटका केली. काही मिनिटे अधिक विलंब झाला असता मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे उपस्थितांनी सांगितले.
या घटनेनंतर रेखा पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, “एवढा मोठा निधी खर्च करूनही जर निकृष्ट दर्जाचे ई-टॉयलेट पर्यटकांच्या जीवावर बेतत असेल, तर अशा सुविधेचा उपयोग काय? अशा धोकादायक ई-टॉयलेटची तातडीने तपासणी करून आवश्यक ती कारवाई करावी,” अशी मागणी केली.
सुटका झाल्यानंतर संबंधित महिलेने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती दिली. “काळ आला होता पण वेळ आली नव्हती,” असे सांगत तिने ई-टॉयलेटमध्ये अडकल्यामुळे हाताला झालेली दुखापतही दाखवली. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून नगरपालिकेने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी तिने केली. तिच्या पतीनेही सोशल मीडियावर पोस्ट करत ई-टॉयलेटच्या निकृष्ट दर्जाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, ई-टॉयलेटच्या खरेदी प्रक्रियेची, खर्चाची आणि दर्जाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
यासंदर्भात माजी मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांनीही तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “हे ई-टॉयलेट आहे की मृत्यूचा सापळा? महिलेच्या पतीच्या वेळीच लक्षात हा प्रकार आला नसता, तर गुदमरून मोठी दुर्घटना घडली असती. नगरपालिकेने तातडीने आपला कारभार सुधारावा, अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल. दिल्लीतील अशा घटनांची पुनरावृत्ती माथेरानमध्ये होऊ शकते
या घटनेमुळे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमधील सार्वजनिक सुविधांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, नागरिकांसह पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.








