‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात बाल दिंडी उत्साहात
भक्ती, संस्कार आणि समतेचा संदेश देत बाल दिंडी सोहळा संपन्न
मोतीराम पादीर / कर्जत:
आषाढी एकादशीनिमित्त रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा, शेलू येथे शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेला बाल दिंडी सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि संस्कारमय वातावरणात संपन्न झाला. “ज्ञानोबा माऊली… तुकाराम” या अखंड गजराने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या विचारांचा वारसा जपत विद्यार्थ्यांनी भक्ती, संस्कार, समता, मानवता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविला.
या बाल दिंडी सोहळ्याचा शुभारंभ कर्जत पंचायत समितीचे सदस्य महेश लक्ष्मण खारीक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी शाळा परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषात आणि अभंग-भजनांच्या सुरेल सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा जिवंत केली.
दिंडी मार्गावर गावातील नागरिकांनी विद्यार्थ्यांचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करत फुलांची उधळण करून आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी संतांच्या वेशभूषेत साकारलेल्या विविध भूमिका आणि शिस्तबद्ध सहभागामुळे दिंडी विशेष आकर्षण ठरली.
दिंडीची सांगता महेश लक्ष्मण खारीक यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दुर्वास विठ्ठल सोनावणे तसेच शिक्षक सुनील जाधव, विशाल सूर्यवंशी, लताबाई गवई, अलका कंधारे आणि शोभा गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव, नैतिक मूल्ये, सामाजिक एकात्मता आणि वारकरी परंपरेबद्दल आदर निर्माण करणारा हा बाल दिंडी सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.







