‘माऊली… माऊली’च्या गजरात गेंगे शिशु मंदिराची भव्य दिंडी
विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेत बालगोपाळांचे आकर्षक सादरीकरण
रायगडचे वादळ न्यूज नेटवर्क / कर्जत:
आदिजन विद्या प्रसारक मंडळ, कर्जत संचलित गेंगजे शिशु मंदिर, चिंचोली-डिकसळ येथे शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी आषाढी एकादशी निमित्त आयोजित करण्यात आलेला पारंपरिक दिंडी सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या आनंदाने संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध सांस्कृतिक सादरीकरणांची आकर्षक तयारी केली होती. लहानग्यांच्या निरागस सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
कार्यक्रमात इयत्ता पहिलीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विठ्ठल व रुक्मिणीची वेशभूषा साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. इयत्ता दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांनी चक्री भजनाचे मनमोहक सादरीकरण केले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि “विठ्ठल… विठ्ठल”, “माऊली… माऊली”च्या जयघोषात दिंडी काढत वारकरी परंपरेचा सुंदर अनुभव उपस्थितांना दिला.
याचबरोबर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी ‘माऊली… माऊली’ या टाळनादावर आधारित नृत्य सादर करून उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळवली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून भक्ती, संस्कार आणि वारकरी परंपरेचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित झाले.
या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनीषा विनोद बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. यावेळी सौ. म्हसे, सौ. बोराडे, सौ. महाले, श्री. म. सोनवणे, सौ. डोले, सौ. जायभाये आणि गवारी हे शिक्षक उपस्थित होते. तसेच शिक्षकेतर कर्मचारी सौ. रकले, सौ. दळवी, सेविका सौ. कडूसकर आणि मलदगे सर यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.
भक्तिमय वातावरण, वारकरी परंपरेचे दर्शन घडविणारी दिंडी, विद्यार्थ्यांची आकर्षक वेशभूषा आणि सांस्कृतिक सादरीकरणांमुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला. उपस्थित पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे आणि शाळेच्या उपक्रमशीलतेचे कौतुक केले.








