पेपर लीक प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी
‘शिक्षण हक्क आमचा, भीक नाही’च्या घोषणांनी कर्जत दणाणले; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
NEET-TET पेपर लीकविरोधात तरुणाईचा एल्गार; संविधान आणि न्यायासाठी शांततापूर्ण आंदोलन
नरेश जाधव | कर्जत:
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठीचार्जाच्या निषेधार्थ तसेच NEET व TET पेपर लीक प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शनिवारी (दि. २५ जुलै) कर्जत येथे विद्यार्थी व तरुण युवकांच्या वतीने शांततापूर्ण निषेध आंदोलन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे सकाळी ११ वाजता झालेल्या आंदोलनात विद्यार्थी, युवक आणि विविध सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. “विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जाऊ शकत नाही”, “शिक्षण हक्क आमचा, भीक नाही”, “आता कागदपत्रांची गळती नाही” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या आंदोलनालाही समर्थन जाहीर केले.
आंदोलनानंतर सहभागी नागरिकांनी कर्जत प्रशासकीय भवन येथे जाऊन प्रांताधिकारी प्रकाश संकपाळ यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनात विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जाचा निषेध, शांततापूर्ण आंदोलनांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण, तसेच NEET व TET पेपर लीक प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी “जय संविधान”, “संविधान जिंदाबाद”, “जय शिवराय”, “जय भीम” आणि “जय भारत” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले.
आंदोलनाचे आयोजन “चलो साथी क्रांती करो” या समूहाच्या वतीने करण्यात आले असून यावेळी या आंदोलनाचे नेतृत्व सुजल गायकवाड, एडवोकेट सुरज पंडित, गौरव गायकवाड, प्रसन्न बनसोडे, धर्मेश परमार, विराज गोतारणे, वैभव दळवी, अविनाश शिर्के, सिद्धेश मेंढरे, सुमेध गायकवाड आदी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









