शारदा मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलची भक्तिमय दिंडी
कपालेश्वर आणि दहिवली विठ्ठल मंदिर परिसर हरिनामाने दुमदुमला
भक्ती, संस्कार आणि पर्यावरणाचा संदेश
नरेश जाधव / कर्जत:
आषाढी एकादशीचे औचित्य साधत कर्जत येथील शारदा मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी भक्तिमय दिंडी व ‘वृक्ष दिंडी’चे आयोजन करण्यात आले. सकाळ व दुपार अशा दोन्ही सत्रांमध्ये पार पडलेल्या या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरा, भारतीय संस्कृती, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीचा प्रभावी संदेश देत उपस्थितांची मने जिंकली.
दुपार सत्रातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या भक्तिभावाने कर्जत येथील श्री कपालेश्वर मंदिरापर्यंत दिंडीत सहभाग घेतला. टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या अखंड घोषात आणि अभंगांच्या सुरेल सादरीकरणामुळे मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायातील पारंपरिक अभंग व भक्तिगीते सादर करून उपस्थित भाविकांना भक्तिरंगात रंगविले. या सांगीतिक सादरीकरणासाठी शाळेच्या संगीत शिक्षिका सौ. शाल्मली लेले यांनी विशेष मार्गदर्शन केले.
दिंडीत सहभागी झालेल्या मुलांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा, तर मुलींनी आकर्षक नऊवारी साडी परिधान करून वारकरी संस्कृतीचे सुंदर दर्शन घडविले. शिस्तबद्ध चाल, हरिनामाचा गजर आणि पारंपरिक पोशाखामुळे दिंडीने सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. स्मिता पुरोहित, सौ. प्रतीक्षा ठाकरे, कु. अस्मिता जाधव आणि सौ. हेमा दगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. छाया नगरकर यांच्या उपस्थितीत हा उपक्रम अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
विद्यार्थ्यांमध्ये वारकरी परंपरा, भक्ती, संस्कार आणि भारतीय सांस्कृतिक मूल्यांविषयी जिव्हाळा निर्माण व्हावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. पालक, भाविक आणि नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे मनापासून कौतुक केले.
दरम्यान, शाळेच्या सकाळ सत्रात आयोजित करण्यात आलेली ‘वृक्ष दिंडी’ हा देखील विशेष आकर्षणाचा विषय ठरला. या उपक्रमाची संकल्पना मुख्याध्यापिका सौ. छाया नगरकर यांनी मांडली होती. आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, तसेच सेवा, समर्पण, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची भावना त्यांच्या मनात रुजावी, या उद्देशाने या अनोख्या दिंडीचे आयोजन करण्यात आले.
इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत टाळ-मृदंगाच्या गजरात अभंग गात, हातात विविध वृक्षांची रोपे आणि ‘स्वच्छ वारी – सुंदर वारी’, ‘स्वच्छता हीच खरी सेवा’ असे संदेश देणारे फलक घेऊन दिंडीत सहभाग घेतला. या उपक्रमातून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीचा प्रभावी संदेश देण्यात आला.
ही दिंडी दहिवली येथील श्री विठ्ठल मंदिर संस्थान येथे पोहोचली. मंदिरात विद्यार्थ्यांनी सौ. शाल्मली लेले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध अभंग सादर केले. तसेच ‘मला पंढरीला नेलं गं बया’ आणि ‘मोबाईल चावला’ या आधुनिक भारुडांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका सौ. छाया नगरकर, उपमुख्याध्यापिका सौ. यमाजी तसेच शिक्षिका सौ. सुजाता बडेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सौ. शाल्मली लेले यांनी केले.
कार्यक्रमाच्या समारोपानंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. संपूर्ण उपक्रमाचे उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध अंमलबजावणी आणि समन्वय यासाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.
भक्ती, संस्कार, पर्यावरणप्रेम आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमामुळे आषाढी एकादशीचा उत्सव अधिक संस्मरणीय ठरला असून, शारदा मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचा आणि भारतीय संस्कृतीचा प्रभावी वारसा जपल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.











