युवा कार्यकर्ते नितेश बाचल यांच्या मित्रपरिवाराकडून स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर आवाज उठवल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?
सीसीटीव्ही यंत्रणा बंद, दोषींवर कारवाईचे आश्वासन
कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार का?
नरेश जाधव | कर्जत, रायगड:
कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील स्वच्छतागृहांच्या दयनीय अवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्वच्छतागृहांच्या अस्वच्छतेचा व्हिडिओ युवा कार्यकर्ते नितेश बाचल यांच्या मित्रपरिवाराकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एकीकडे शासनाकडून आरोग्य सुविधांसाठी लाखो-कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असताना दुसरीकडे रुग्णालयातील मूलभूत सुविधांची अशी दुरवस्था का? असा सवाल उपस्थित होत आहे.
कर्जत हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून, कर्जत नगरपरिषद हद्दीत असलेल्या या उपजिल्हा रुग्णालयात तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील गोरगरीब नागरिक उपचारासाठी येत असतात. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना आवश्यक असलेल्या स्वच्छतागृहांसारख्या मूलभूत सुविधांचीच दुरवस्था असेल, तर सर्वसामान्य रुग्णांनी अपेक्षा तरी कोणाकडून ठेवायची? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतरच उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाला जाग येणार का? रुग्णालयातील समस्या समोर आणण्यासाठी प्रत्येक वेळी नागरिकांनी सोशल मीडियाचा आधार घ्यायचा का? रुग्णालयातील स्वच्छता, देखभाल आणि मूलभूत सुविधांची व्यवस्था राखण्याची नैतिक जबाबदारी संबंधित प्रशासनाची नाही का? असे अनेक प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत.

दुसरीकडे, रुग्णालयाला भेट देणारे लोकप्रतिनिधी आणि राजकीय पदाधिकारी यांच्याकडून पाहणी, भेटीगाठी आणि फोटोसेशन करून सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्याला प्राधान्य दिले जात आहे का? प्रत्यक्षात रुग्णांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचे निराकरण करण्यासाठी किती ठोस प्रयत्न केले जात आहेत? प्रसिद्धीपेक्षा रुग्णसेवेला प्राधान्य देण्याची गरज असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
अधीक्षक डॉ. दीपक अडकमोल यांची प्रतिक्रिया
यासंदर्भात कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दीपक अडकमोल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, काल रात्रीच्या सुमारास काही मुले दारूच्या नशेत रुग्णालयात आली होती. त्यांनी गुटखा खाऊन त्याचे अवशेष बेसिनमध्ये टाकल्यामुळे बेसिन जाम झाले. तसेच उपचारासाठी आलेल्या काही व्यक्तींनी अन्नपदार्थही स्वच्छतागृहात टाकल्याने अस्वच्छतेची परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, संबंधित प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे का? असा प्रश्न पत्रकार तथा संपादक, रायगडची झुंज न्यूजचे नरेश जाधव यांनी उपस्थित केला असता, डॉ. अडकमोल यांनी सध्या सीसीटीव्ही यंत्रणा बंद असून तिच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगितले. मात्र, सिक्युरिटी गार्डकडून माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
सीसीटीव्ही यंत्रणा बंद; मग दोषींवर कारवाई कशी?
रुग्णालय प्रशासनाकडून स्वच्छतागृहांच्या अस्वच्छतेसाठी काही नागरिकांच्या बेजबाबदार वर्तनाला जबाबदार धरले जात असले, तरी रुग्णालयातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याची बाबही तितकीच गंभीर आहे. सार्वजनिक आरोग्य संस्थेत सुरक्षेच्या आणि देखरेखीच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नसणे ही चिंतेची बाब आहे.
संबंधितांनी गुटखा खाऊन बेसिनमध्ये टाकल्यामुळे ते जाम झाले असेल, तर अशा व्यक्तींवर कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र, सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याने संबंधितांची ओळख कशी पटविणार? केवळ सिक्युरिटी गार्डकडून माहिती घेऊन कारवाई होणार की या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी केली जाणार, हा प्रश्नही अनुत्तरित आहे.
तसेच रुग्णालयातील स्वच्छता, देखभाल आणि मूलभूत सुविधांची नियमित तपासणी करण्याची जबाबदारी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची नाही का? स्वच्छतागृहांची अशी अवस्था होईपर्यंत प्रशासनाचे लक्ष का गेले नाही? कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का? की सर्व जबाबदारी नागरिकांच्या बेजबाबदार वर्तनावर ढकलून प्रशासन आपली जबाबदारी झटकणार? असे सवाल उपस्थित होत आहेत.
या संपूर्ण प्रकाराची वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन व्हायरल झालेल्या व्हिडिओची सत्यता तपासावी. रुग्णालयातील स्वच्छतागृहांची प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घ्यावा. संबंधित ठेकेदार, देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी आणि स्वच्छतेसाठी खर्च होणाऱ्या निधीची तपासणी करावी. तसेच निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित ठेकेदार आणि जबाबदार प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
प्रश्न एकच… सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? रुग्णालयातील समस्या समोर आणण्यासाठी प्रत्येक वेळी नागरिकांनी आवाज उठवायचा का? लोकप्रतिनिधींचे फोटोसेशन आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धीपेक्षा रुग्णसेवेला प्राधान्य देण्याची वेळ आली नाही का? कर्जतकर नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल रायगडचे वादळ चे पत्रकार तथा रायगडची झुंज न्यूज चे संपादक नरेश जाधव यांनी उपस्थित केला आहे.








