रेल्वे प्रशासनाकडून पुन्हा मुदत चुकली
श्रीकांत खुपेरकर | कल्याण:
कसारा रेल्वे मार्गावरील प्रवाशांना १५ डब्यांच्या लोकलसाठी अद्याप प्रतीक्षा करावी लागत आहे. या मार्गावरील सर्व स्थानकांचे फलाट विस्तारीकरण पूर्ण झाल्यानंतरही रेल्वे प्रशासनाला १५ डब्यांच्या लोकल सुरू करण्यात यश आलेले नाही. सध्या या मार्गावर केवळ १२ डब्यांच्या लोकल धावत आहेत.
यापूर्वी सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत १५ डब्यांच्या लोकल सुरू होतील, अशा बातम्या विविध माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, त्यानंतर रेल्वे प्रशासनाने १५ नोव्हेंबर २०२६ ही नवीन तारीख जाहीर केली. ही तारीखही उलटून गेल्याने प्रवाशांची निराशा झाली असून लोकल प्रत्यक्षात कधी सुरू होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी रेल्वे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
“रेल्वे प्रशासन प्रवाशांना फक्त तारीख पे तारीख देत आहे. आधी सप्टेंबर, त्यानंतर १५ नोव्हेंबर, आता पुढची तारीख कोणती? सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी १२ डब्यांच्या लोकलमध्ये उभे राहायलाही जागा नसते. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी जीव मुठीत धरून प्रवास करतात,” असे घनघाव यांनी सांगितले.
संघटनेने १५ डब्यांच्या लोकल सुरू करण्याची निश्चित आणि अंतिम तारीख जाहीर करावी, तसेच पुन्हा मुदतवाढ दिल्यास त्याला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तोपर्यंत गर्दीच्या वेळेत जादा लोकल सोडाव्यात. सकाळी आणि संध्याकाळी कसारा-कर्जत मार्गावर लोकलची संख्या वाढवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाने केवळ आश्वासने देत वेळकाढूपणा सुरू ठेवल्यास १ डिसेंबर २०२६ रोजी होणाऱ्या जनआंदोलनात १५ डब्यांच्या लोकलचा मुद्दा प्रमुख असेल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
“आम्ही तारीख मागत नाही, आम्ही गाड्या मागत आहोत. तारीख पे तारीख देणे बंद करा, अन्यथा प्रवाशांना रस्त्यावर उतरावे लागेल,” असा इशारा राजेश घनघाव यांनी दिला.







