उल्हास नदीच्या तीरासह नेरळ गणेश घाटावर सूर्यदेवाला सामूहिक अर्घ्य
दहिवलीतील उल्हास नदी तीरावरील गणेश घाटासह नेरळच्या गणेश घाटावर छठी मैयाची आराधना
७० हून अधिक कुटुंबांचा सहभाग, पारंपरिक विधी आणि प्रसादातून उत्तर भारतीय संस्कृतीचे दर्शन
आनंद सकपाळ | नेरळ:
उत्तर भारतीय समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या छठपूजा उत्सवाचा भक्तिमय सोहळा नेरळ परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला. सूर्यदेव आणि छठी मैया यांची श्रद्धापूर्वक आराधना करत भाविकांनी उल्हास नदीच्या तीरावर पारंपरिक पद्धतीने पूजा केली. नेरळ येथील गणेश घाटावर ही छठ माई देवी सामाजिक सेवा संस्था यांच्या माध्यमातून या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दहिवली येथील उल्हास नदीवरील गणेश घाट तसेच नेरळ येथील गणेश घाटावर झालेल्या छठपूजेत एकूण ७० हून अधिक भाविक कुटुंबांनी सहभागी होत आपली धार्मिक परंपरा जपली.

छठपूजा हा प्रामुख्याने बिहार, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश आणि नेपाळ या भागांत मोठ्या श्रद्धेने साजरा केला जाणारा चार दिवसांचा महत्त्वपूर्ण हिंदू सण आहे. सूर्यदेव हे ऊर्जा, आरोग्य आणि जीवनाचे आधार मानले जातात, तर छठी मैयाची पूजा कुटुंबाचे कल्याण, संततीचे सुख आणि दीर्घायुष्यासाठी केली जाते. काळानुसार उत्तर भारतीय समाज देशाच्या विविध भागांत स्थायिक झाला असला, तरी आपल्या धार्मिक परंपरा आणि संस्कृतीचे जतन करण्याची भावना आजही कायम असल्याचे नेरळमधील या आयोजनातून दिसून आले.

छठपूजेच्या निमित्ताने व्रतस्थ महिलांनी अत्यंत श्रद्धेने आणि कठोर नियमांचे पालन करत चार दिवसांचे व्रत पूर्ण केले. पहिल्या दिवशी नहाय-खाय विधीद्वारे शुद्धता आणि स्वच्छतेला महत्त्व देण्यात आले. दुसऱ्या दिवशी खरना विधी पार पाडून गुळाची खीर आणि रोटीचा प्रसाद ग्रहण करण्यात आला. त्यानंतर निर्जल उपवासाला सुरुवात झाली. तिसऱ्या दिवशी नदीच्या घाटावर पाण्यात उभे राहून मावळत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करण्यात आले. ठेकुआ, फळे आणि पारंपरिक नैवेद्य सूर्यदेवाला अर्पण करून छठी मैयाची आराधना करण्यात आली. चौथ्या दिवशी पहाटे उगवत्या सूर्याला अर्घ्य देत प्रार्थना करण्यात आली आणि त्यानंतर पारण करून व्रताची सांगता झाली.

दहिवली येथील उल्हास नदीवरील गणेश घाटावर सुमारे २० कुटुंबांनी छठपूजेत सहभाग घेतला, तर नेरळ येथील सणेश घाटावर ५० हून अधिक भाविक कुटुंबांनी एकत्र येत सूर्योपासना केली. पारंपरिक वेशभूषा, पूजेची सजावट, फळे आणि प्रसादाने घाट परिसराला धार्मिक स्वरूप प्राप्त झाले होते. नदीच्या पात्रात उभे राहून अस्ताला जाणाऱ्या आणि उगवत्या सूर्याला अर्घ्य देतानाचे दृश्य भाविकांसाठी श्रद्धा आणि भक्तिभावाचा अविस्मरणीय अनुभव ठरले.

या आयोजनासाठी छठ माई देवी सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष अमरेंद्र सिंह, उपाध्यक्ष रमाकांत पाठक यांच्यासह मनिष सिंह, अजय पांडे, नंदलाल प्रजापती, विनोद शुक्ला आणि अजित तिवारी यांनी विशेष पुढाकार घेतला. उत्तर भारतीय समाजातील नागरिकांनी एकत्र येत धार्मिक परंपरेचे जतन करण्यासोबतच सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक बांधिलकीचा संदेश या उत्सवातून दिला.

परंपरेचे जतन, श्रद्धेचा संगम आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारी नेरळमधील छठपूजा यंदाही भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.












