आधार जनसेवा संस्थेचा सामाजिक उपक्रम
आदिवासी वस्तीपासून घरेलू कामगार महिलांपर्यंत मदतीचा हात
गरजू कुटुंबांना फराळ साहित्य, महिलांना साडी वाटप
नरेश जाधव | कर्जत, रायगड:
दिवाळीचा सण प्रत्येकाच्या घरात आनंदाने आणि उत्साहात साजरा व्हावा, या सामाजिक भावनेतून आधार जनसेवा सामाजिक संस्थेच्या वतीने कर्जत तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. आदिवासी वस्तीतील गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ साहित्याचे वाटप, गोरगरीब महिलांना साडी वाटप तसेच घरेलू कामगार महिलांसाठी भाऊबीज उपक्रम राबवून संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे.

संस्थेचे अध्यक्ष व संस्थापक गणेश कांबळे यांच्या पुढाकाराने तसेच समाजरत्न शेठ नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या सहकार्याने कोंढीवडे येथील आदिवासी चोचीवाडीमध्ये गरजू कुटुंबांना दिवाळी फराळासाठी लागणाऱ्या साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी रवा, मैदा, साखर आणि डालड्याचे पाच किलोचे पॅकेट देण्यात आले.
सध्याच्या महागाईच्या काळात आर्थिक परिस्थितीमुळे अनेक गरजू कुटुंबांना दिवाळीचा फराळ करणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन संस्थेने हा उपक्रम राबविला. त्यामुळे आदिवासी वस्तीतील कुटुंबांच्या दिवाळीत गोडवा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.

तसेच दि. ७ नोव्हेंबर २०२६ रोजी आधार जनसेवा सामाजिक संस्थेच्या वतीने गुंडगे विभागातील गोरगरीब व गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले. याच दिवशी दुर्गम भागातील आदिवासी वस्तीमध्ये जाऊन आदिवासी मुलांना मिठाईचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
यानंतर दि. ८ नोव्हेंबर २०२६ रोजी गुंडगे येथे घरेलू काम करणाऱ्या महिलांसाठी दिवाळी भाऊबीज उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शेठ नानजीभाई खिमजीभाई ठक्कर यांच्या सहकार्याने आणि आधार जनसेवा सामाजिक संस्थेच्या जिल्हाध्यक्ष मा. मीनाक्षीताई संतोष भवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
या विविध उपक्रमांमधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे, आदिवासी बांधव, महिला आणि बालकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचे काम संस्थेने केले आहे. केवळ सण साजरा करण्यापुरते मर्यादित न राहता समाजातील गरजू घटकांच्या आनंदात सहभागी होण्याचा संस्थेचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे.
या उपक्रमावेळी संस्थेचे अध्यक्ष गणेश कांबळे, खजिनदार संगीता कांबळे, महादेव म्हात्रे, देवेंद्र भारती, संदीप पावसकर, अमीर मणियार, सुरज यादव, सुनील चव्हाण, मीनाक्षी भवार, तुषार कांबळे, कांता गाडे, लीला जाधव, सुरेखा माने, राणू कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याच्या उद्देशाने आधार जनसेवा सामाजिक संस्था सातत्याने विविध उपक्रम राबवीत असून, संस्थेच्या या सेवाभावी कार्याचे कर्जत तालुक्यातून कौतुक होत आहे.








