झुगरेवाडी शाळेची पुन्हा एकदा गरुड भरारी
एन सी ई आर टी भोपाळच्या राष्ट्रीय कार्यशाळेसाठी मुख्याध्यापक रवी काजळे यांची निवड
ठाकूर-कातकरी बोलीभाषेतील लोकगीते, बालगीते आणि बडबडगीतांच्या संकलनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी
आनंद सकपाळ | नेरळ:
दुर्गम आदिवासी वाड्यांमधील शिक्षणाचा दीप प्रज्वलित करतानाच स्थानिक बोलीभाषा आणि लोकसंस्कृतीच्या जतनासाठी झटणाऱ्या कर्जत तालुक्यातील झुगरे वाडी जिल्हा परिषद शाळेने पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एन सी ई आर टी), भोपाळ येथे आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेसाठी शाळेचे मुख्याध्यापक तथा राज्य आदर्श शिक्षक रवी काजळे यांची निवड झाली असून, महाराष्ट्रातील ठाकूर आणि कातकरी आदिम जनजातींच्या बोलीभाषेतील लोकगीते, बालगीते आणि पारंपरिक बडबडगीतांचे संकलन व पुस्तकनिर्मितीची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. नुकतीच ही कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली. विशेष म्हणजे, या उपक्रमातून कर्जतच्या आदिवासी समाजाची मौखिक परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि झुगरे वाडी शाळेची स्वतःची गीते राष्ट्रीय स्तरावर पोहोचणार असल्याने रायगडच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद कामगिरी ठरली आहे.

लोप पावत चाललेल्या बोलीभाषांच्या जतनासाठी पुढाकार
आदिवासी समाजाच्या बोलीभाषा या केवळ संवादाचे माध्यम नसून त्यातून पिढ्यान्पिढ्या जपली गेलेली संस्कृती, परंपरा, जीवनपद्धती आणि लोकज्ञान व्यक्त होत असते. मात्र, बदलत्या काळात या मौखिक परंपरा आणि बोलीभाषांमधील साहित्य लोप पावण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही सांस्कृतिक संपदा पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याच्या उद्देशाने एन सी ई आर टी च्या माध्यमातून हा राष्ट्रीय उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना रवी काजळे यांनी ठाकूर आणि कातकरी बोलीभाषांतील लोकगीते, बालगीते व बडबडगीतांच्या संकलन आणि लेखन प्रक्रियेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या यापूर्वी प्रकाशित झालेल्या ठाकरी भाषेतील पुस्तकातील निवडक बालगीतांचाही राष्ट्रीय पुस्तकनिर्मिती उपक्रमात समावेश करण्यात येणार आहे.

२८ वर्षांपासून दुर्गम भागातील शिक्षणसेवेचा वसा
रवी काजळे हे १९९८ पासून कर्जत तालुक्यातील दुर्गम आणि आदिवासीबहुल भागात शैक्षणिक सेवा बजावत आहेत. आदिवासी व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे आणि शिक्षण अधिक आनंददायी व कृतीशील बनविण्यासाठी त्यांनी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच त्यांच्या मातृभाषेचा सन्मान, स्थानिक संस्कृतीची ओळख आणि लोकपरंपरांचा शिक्षणाशी संबंध जोडण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे. त्यामुळे झुगरे वाडी शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था न राहता स्थानिक लोकसाहित्य आणि शैक्षणिक नवोपक्रमांचा संगम बनली आहे.
केरळ नंतर भोपाळमध्येही झुगरेवाडीचा डंका
यापूर्वी झुगरेवाडी शाळेने केरळ येथे आयोजित क्रिटिकल स्टोरी कार्यशाळेत सहभाग नोंदवत राष्ट्रीय स्तरावर आपल्या कार्याची छाप उमटविली होती. आता एन सी ई आर टी भोपाळच्या राष्ट्रीय कार्यशाळेत मुख्याध्यापक रवी काजळे यांची निवड झाल्याने शाळेच्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक मानाचा टप्पा जोडला गेला आहे. विशेष म्हणजे, या पुस्तकात झुगरे वाडी शाळेच्या स्वतःच्या गीतांचाही समावेश होणार असल्याने एका दुर्गम आदिवासी वाडीतील शाळेचे साहित्य राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याचा अनोखा योग जुळून आला आहे.
लोकगीते संकलनासाठी ग्रामस्थांचाही मोलाचा सहभाग
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे लोकसाहित्य संकलनाची प्रक्रिया केवळ शिक्षकांपुरती मर्यादित न ठेवता स्थानिक समाजातील ज्येष्ठ व्यक्ती, महिला आणि लोकपरंपरांचे जाणकार यांनाही सहभागी करून घेण्यात आले. सहायक कर आयुक्त नयन वाघ, कवी पारधी, जनार्दन पारधी आणि सावळा कुटुंबीय यांनी या कामात मोलाचे सहकार्य केले. आदिवासी समाजातील महिलांकडून विविध सण-उत्सव, विवाहप्रसंग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गायली जाणारी पारंपरिक गीते संकलित करण्यात आली. या गीतांचे व्हिडिओ चित्रीकरण करून त्यांचे दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे. या व्हिडिओंच्या आधारे माहितीपट तयार करण्याचे नियोजन असून, निवडक गीतांचा राष्ट्रीय स्तरावरील पुस्तकात समावेश केला जाणार आहे. त्यामुळे झुगरे वाडी, ऐनाचीवाडी आणि कर्जत तालुक्यातील आदिवासी लोकसंस्कृतीला व्यापक ओळख मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.
राष्ट्रीय मान्यवरांचे मार्गदर्शन
महाराष्ट्र राज्याचे समन्वयक डॉ. व्यंकट सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली तसेच डॉ. मखवाना आणि विभागप्रमुख डॉ. रत्नमाला आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली. या उपक्रमासाठी एस सी ई आर टी पुणे उपसंचालक डॉक्टर कमलादेवी आवटे, शिक्षण मंत्री यांचे स्वीय सहायक चंद्रकांत साबळे, ,सचिन चव्हाण ,पूर्व उपसंचालक डॉक्टर नेहा बेलसरे,आर ए ए संभाजीनगरचे सहसंचालक डॉ. विशाल तायडे, राज्य संयोजक विक्रम अडसूळ, डॉ. व्यंकट सूर्यवंशी आणि अविनाश गोप नारायण यांनी विशेष सहकार्य केले.
शिक्षण विभागासह ग्रामस्थांकडून अभिनंदन
रवी काजळे यांच्या या राष्ट्रीय स्तरावरील निवडीबद्दल रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, उपशिक्षणाधिकारी सुनील भोपळे, गटशिक्षणाधिकारी अनंत खैरे आणि केंद्रप्रमुख अमोल चोळके यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ग्रामस्थ, पालक, शिक्षकवर्ग आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडूनही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
झुगरेवाडी शाळेचे हे यश म्हणजे केवळ एका शिक्षकाच्या निवडीचा सन्मान नसून आदिवासी समाजाच्या भाषा, संस्कृती, लोकसाहित्य आणि सामूहिक लोकसहभागाचा गौरव आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळाही कल्पकता, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करू शकतात, याची प्रचिती झुगरे वाडी शाळेच्या या कामगिरीतून पुन्हा एकदा आली आहे.








