रोहित पवार १६ नोव्हेंबरला करणार मोठा खुलासा
अपघात की घातपात? आरोपींना वाचवणाऱ्या नेत्याचे नाव जाहीर करण्याचा दावा; पत्रकार परिषदेकडे राज्याचे लक्ष
रायगडचे वादळ न्यूज नेटवर्क | मुंबई :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळावर विमान उतरत असताना झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी सुरुवातीपासूनच हा केवळ अपघात नसून घातपात असण्याची शक्यता व्यक्त करत विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणाच्या अनुषंगाने त्यांनी आतापर्यंत अनेक पत्रकार परिषदा घेऊन आपली भूमिका मांडली आहे. आता या प्रकरणात आरोपींना वाचवणाऱ्या नेत्याचे नाव जाहीर करणार असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
यासंदर्भातील महत्त्वाची पत्रकार परिषद १६ नोव्हेंबर रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टरवर, ‘अजितदादांच्या अपघात किंवा घातपातामागील आरोपींना वाचवणारा तो नेता कोण?’ असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, या पोस्टरवर कोणत्याही नेत्याचा फोटो न दाखवता केवळ मफलरचे छायाचित्र वापरण्यात आले आहे. त्यामुळे हा मफलर नेमका कोणत्या नेत्याचे प्रतीक आहे आणि रोहित पवार कोणाचे नाव जाहीर करणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पत्रकारांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना रोहित पवार यांनी सांगितले की, ही पत्रकार परिषद ते गेल्या अनेक दिवसांपासून घेण्याच्या तयारीत होते. मात्र, या प्रकरणासंदर्भात सातत्याने नवीन माहिती समोर येत असल्याने त्यांनी पत्रकार परिषद घेण्याचे पुढे ढकलले होते. आता १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत ही पत्रकार परिषद होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात रोहित पवार नेमके कोणते नवीन पुरावे किंवा माहिती समोर आणणार? तसेच आरोपींना वाचवणारा कथित नेता कोण, याबाबत ते काय खुलासा करणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.







