आरिवर्क प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
महिलांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देऊन उद्योजकतेच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाची संधी
मोतीराम पादीर | कर्जत:
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने Entrepreneurship Development Institute of India (EDII) यांच्या वतीने महिलांसाठी विविध कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
या उपक्रमांतर्गत महिलांना सध्या आरिवर्क (Aari Work) या हस्तकलेचे २२ दिवसांचे मोफत प्रशिक्षण* दिले जात आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना आरिवर्क कलेचे व्यावसायिक कौशल्य आत्मसात करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून उत्पन्नाचे साधन निर्माण करता येणार असून, त्यातून त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमाला Arun BN, Project Head – EDII यांनी भेट देऊन प्रशिक्षणाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रशिक्षणार्थी महिलांशी संवाद साधत त्यांच्या प्रगतीची माहिती घेतली आणि त्यांना प्रोत्साहन दिले.
EDII च्या माध्यमातून आरिवर्क, फूड प्रोसेसिंग, क्रोशे आर्ट,आर्टिफिशियल ज्वेलरी यांसह एकूण आठ कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणांचा मुख्य उद्देश महिलांमध्ये उद्योजकतेची भावना विकसित करणे, त्यांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी सक्षम बनविणे आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणे हा आहे.
यावेळी Arun BN, Project Head – EDII यांनी समुदायातील महिलांना या संधीचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. उपलब्ध प्रशिक्षण कार्यक्रमांचा योग्य उपयोग करून कौशल्य विकसित करावे आणि त्यातून स्वतःचा व्यवसाय उभारण्याच्या दिशेने पाऊल टाकावे, असे त्यांनी सांगितले.
महिलांच्या हाताला कौशल्य, कौशल्याला व्यवसाय आणि व्यवसायातून आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या दिशेने EDII चा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.







