सजवलेल्या बैलांच्या मिरवणुकीने ग्रामीण संस्कृतीचे दर्शन
‘इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो’च्या जयघोषात बळीराजाचे पूजन
भाताच्या पेंढ्याला पेटवून त्यावरून बैलांच्या उड्या, नेरळ-ममदापूर परिसरात परंपरेचा जागर
आनंद सकपाळ | नेरळ:
शेती, पशुधन आणि ग्रामीण संस्कृतीशी अतूट नाते सांगणारी बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्याची परंपरा कर्जत तालुक्यात यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. ‘इडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’ असा जयघोष करत बळीराजाचे पूजन, शेतीच्या अवजारांची पूजा आणि सजवलेल्या बैलांची वाद्यांच्या गजरात काढण्यात आलेली मिरवणूक अशा पारंपरिक वातावरणात तालुक्यातील ग्रामीण भागात बलिप्रतिपदेचा सण साजरा झाला. नेरळ पाडा, नेरळ खांडा विभागासह ममदापूर गावात बैलांच्या मिरवणुका आणि पारंपरिक प्रथांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका हा शेतीप्रधान आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला भाग म्हणून ओळखला जातो. कोकणातील ग्रामीण संस्कृतीमध्ये बलिप्रतिपदेला विशेष महत्त्व आहे. भातशेतीचा हंगाम संपून नवीन धान्य घरात येण्याचा हा काळ शेतकऱ्यांसाठी आनंदाचा असतो. त्यामुळे बलिप्रतिपदा हा केवळ दिवाळीतील एक सण नसून कृषिसंस्कृती, पशुधनाप्रती कृतज्ञता आणि कौटुंबिक नातेसंबंध जपणारा उत्सव म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी घराच्या अंगणात किंवा उंबरठ्यावर शेणापासून अथवा पंचरंगी रांगोळीच्या माध्यमातून राजा बळी आणि त्यांची पत्नी विंध्यावली यांची प्रतिमा साकारली जाते. त्यानंतर धान्य आणि फुले अर्पण करून पूजा केली जाते. ‘इडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’ अशी प्रार्थना करत सुख, समृद्धी आणि भरभराटीची कामना केली जाते. शेतकऱ्यांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असलेल्या नांगर, कोयते, विळे तसेच आधुनिक कृषी अवजारांनाही हळद-कुंकू लावून त्यांचे पूजन केले जाते.

बलिप्रतिपदेच्या या उत्सवात पशुधन पूजनाला विशेष महत्त्व असते. पहाटेपासूनच गाई-बैलांना स्वच्छ अंघोळ घालून त्यांची सजावट केली जाते. बैलांच्या अंगावर गेरूचे ठिपके देणे, शिंगांना आकर्षक रंग लावणे, गळ्यात फुलांच्या माळा आणि घुंगरू बांधणे अशा पद्धतीने त्यांना सजवले जाते. त्यानंतर पुरणपोळी, तांदळाची खीर यांसारख्या गोडधोड पदार्थांचा नैवेद्य जनावरांना खाऊ घातला जातो. वर्षभर शेतीच्या कामात मोलाची साथ देणाऱ्या पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही परंपरा आहे.

कर्जत तालुक्यातील काही ग्रामीण भागांत बलिप्रतिपदेच्या दिवशी सजवलेल्या बैलांची गावातून मिरवणूक काढण्याचीही परंपरा आजही जपली जात आहे. यंदा नेरळ पाडा, नेरळ खांडा विभाग आणि ममदापूर येथे शेतकरी व बैलप्रेमींनी आपापल्या बैलांना आकर्षक पद्धतीने सजवून त्यांचे विधिवत पूजन केले. त्यानंतर वाद्यांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत बैलांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. गावातील मंदिरात दर्शनासाठी बैलांना नेल्यानंतर पारंपरिक पद्धतीने बलिप्रतिपदेच्या उत्सवाची सांगता करण्यात आली. या उत्सवातील विशेष आकर्षण म्हणजे रस्त्यावर भाताचा पेंढा पसरवून त्यामध्ये फटाके ठेवून तो पेटवण्याची पारंपरिक प्रथा. पेंढ्याला आग लावल्यानंतर निर्माण झालेल्या ज्वाळांवरून सजवलेल्या बैलांना उड्या मारत पलीकडे नेण्यात आले. या अनोख्या परंपरेला पाहण्यासाठी ग्रामस्थ आणि नागरिकांनी गर्दी केली होती. ग्रामीण संस्कृतीतील या प्रथेमुळे बलिप्रतिपदेच्या उत्सवाला एक वेगळेच पारंपरिक स्वरूप प्राप्त झाले.

दरम्यान, नेरळ वार्ड पंचायत समिती सदस्य भगवान चंचे यांचा ‘कृष्णा’ नावाचा छोटा आणि ठेंगणा बैल यंदाच्या उत्सवात नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. त्याच्या वेगळ्या ठेवणीमुळे आणि आकर्षक सजावटीमुळे उपस्थितांचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले. बैलप्रेमींनी जपलेली ही परंपरा म्हणजे केवळ सणाचा आनंद नसून शेती, पशुधन आणि ग्रामीण जीवनपद्धतीशी असलेले नाते पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे या उत्सवातून दिसून आले.








